१० दिवसांत दुसरा गुन्हा! परळीत १२ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2025 16:07 IST2025-09-09T16:07:01+5:302025-09-09T16:07:28+5:30
रात्रीच्या वेळी घरी परतताना दुर्दैवी घटना; परळीत चिमुकलीवर अत्याचाराने बीड जिल्हा हादरला

१० दिवसांत दुसरा गुन्हा! परळीत १२ वर्षांच्या मुलीवर अत्याचार, दोन अल्पवयीन आरोपी ताब्यात
परळी :शहरातील एका भागात बारा वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची धक्कादायक घटना घडली आहे. सात सप्टेंबरच्या रात्री ही घटना घडली असून याप्रकरणी नऊ सप्टेंबर रोजी संभाजीनगर पोलीस ठाण्यात पहाटे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यापैकी दोघा अल्पवयीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दरम्यान 31 ऑगस्ट रोजी परळीच्या रेल्वे स्थानक परिसरात एका चिमुरडीवर अत्याचाराची घटना घडली होती.
मिळालेल्या माहितीनुसार, सात सप्टेंबर रोजी रात्रीच्या वेळी पीडित मुलगी दुकानावरून घराकडे परत येत असताना 15 व 16 वर्षाच्या दोघा मुलांनी तिचा हात धरून अंधारात पानंदमध्ये नेले आणि तिच्यावर अत्याचार केला. यावेळी त्यांच्या सोबत असलेल्या इतर दोन साथीदारांनी पीडितेला धमकावून आरोपींना मदत केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. पीडितेच्या आईने 8 सप्टेंबर रोजी रात्री दिलेल्या तक्रारीनंतर 9 सप्टेंबर रोजी पहाटे चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी हे विधी संघर्ष गस्त बालक असून पोलिसांनी दोघांना ताब्यात घेतले आहे. तर दोघांचा पोलीस शोध घेत आहेत.
घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक चेतना तिडके, सहाय्यक पोलीस अधीक्षक ऋषिकेश शिंदे, संभाजीनगर पोलीस ठाण्याचे निरीक्षक धनंजय ढोणे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल शिंदे तसेच अंबाजोगाई येथील पिंक पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष जाधवर यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
परळी पुन्हा हादरले
दरम्यान, अवघ्या १० दिवसांपूर्वीच परळी रेल्वे स्थानक परिसरात एका चिमुकलीवर अत्याचाराची घटना घडली होती. त्यानंतर शहरातील दुसऱ्या भागात अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याने परळी शहर हादरून गेले असून नागरिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.