Beed Crime: एकाच प्लॉटची दोनदा विक्री; ग्रामसेवक, सहदुय्यम निबंधकासह चौघांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 15, 2025 11:56 IST2025-11-15T11:56:08+5:302025-11-15T11:56:45+5:30
सहदुय्यम निबंधक कार्यालयानेही या बोगस कागदपत्रांची कोणतीही पडताळणी न करता दस्त नोंदवून घेतल्याचा आरोप

Beed Crime: एकाच प्लॉटची दोनदा विक्री; ग्रामसेवक, सहदुय्यम निबंधकासह चौघांविरुद्ध गुन्हा
माजलगाव : शहराजवळील मनूर परिसरातील तीन प्लॉट दोनदा विकून एका दाम्पत्याची १ लाख ८६ हजार रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी प्लॉट विक्री करणारे दोघे, त्यांना मदत करणारे मनूरचे ग्रामसेवक आणि कागदपत्रांची पडताळणी न करता दस्त नोंदविणारे सहदुय्यम निबंधक यांच्यासह एकूण चौघांविरुद्ध माजलगाव शहर पोलिस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजलगावच्या खाटीक गल्लीतील मुस्ताक अब्दुल रज्जाक खाटीक यांना मनूर परिसरात प्लॉट खरेदी करायचा होता. त्यांनी ओळखीचे शेख मुस्तफा शेख रहीम यांच्याशी संपर्क साधला. मुस्तफा यांनी मनूर ग्रामपंचायत हद्दीतील प्लॉट क्रमांक १८२ हा सलीम नजीर शेख यांच्या मालकीचा असून, तो ६२ हजार रुपयांत मिळवून देतो, असे सांगितले. त्यानुसार, खाटीक यांनी ७ ऑगस्ट २०२४ रोजी ६२ हजार रुपये देऊन खरेदीखत करून घेतले. त्यानंतर आणखी दोन प्लॉट विक्रीस असल्याचे आमिष दाखवून मुस्तफा यांनी खाटीक यांच्या पत्नी रिजवाना यांच्या नावे प्लॉट क्रमांक ४५ व २४६ खरेदी करण्यास भाग पाडले. मुस्ताक खाटीक यांच्या फिर्यादीवरून, प्लॉट विक्री करणारे सलीम नीर शेख, शेख मुस्तफा शेख रहीम, ग्रामसेवक अनिल दाऊतसरे आणि सहदुय्यम निबंधक यांच्यासह संबंधित कर्मचाऱ्यांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, माजलगाव शहर पोलिस पुढील तपास करीत आहेत.
असा झाला घोटाळा उघड
खरेदीनंतर १५ दिवसांनी, मुस्ताक खाटीक हे खरेदी केलेल्या प्लॉटवर आपल्या नावाचा फेरफार करण्यासाठी मनूर ग्रामपंचायत कार्यालयात गेले. तेथे ग्रामसेवक अनिल दाऊतसरे यांनी नाव लावण्यासाठी टाळाटाळ केली आणि उडवाउडवीची उत्तरे दिली. संशय आल्याने खाटीक यांनी थेट प्लॉटवर जाऊन पाहणी केली असता, तिथे आधीपासूनच असलेल्या कब्जेदारांनी हे प्लॉट आपण २०२२-२३ मध्येच कायदेशीररीत्या विकत घेतल्याचे सांगितले व खरेदीचे दस्तऐवज दाखविले. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच मुस्ताक खाटीक यांनी शहर पोलिस ठाणे गाठले.
'ना हरकत प्रमाणपत्र' दिले
ग्रामसेवक अनिल दाऊतसरे यांनी प्लॉटची मालकी सलीम शेख व मुस्तफा शेख यांच्याकडे नसतानाही त्यांना नमुना आठ आणि खरेदीसाठी आवश्यक असलेले 'ना हरकत प्रमाणपत्र' दिले. धक्कादायक बाब म्हणजे, एका दस्त नोंदणी २७ तारखेला झाली असताना, त्याला जोडलेले ना हरकत प्रमाणपत्र २८ तारखेचे आहे. सहदुय्यम निबंधक कार्यालयानेही या बोगस कागदपत्रांची कोणतीही पडताळणी न करता दस्त नोंदवून घेतल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. ही बोगस कागदपत्रे सत्यम कॉम्प्युटर्स येथे शरद भांडेकर यांनी तयार केल्याचेही तक्रारीत म्हटले आहे.