Beed Crime: बापरे! चक्क हद्दपार आरोपीने पाेलिस ठाण्याच्या आवारातूनच चोरला ट्रॅक्टर
By सोमनाथ खताळ | Updated: December 4, 2025 11:43 IST2025-12-04T11:42:42+5:302025-12-04T11:43:25+5:30
शिरूर कासारमधील कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह; आरोपी १३ मार्च २०२५ पासून हद्दपार असूनही जिल्ह्यात सक्रिय

Beed Crime: बापरे! चक्क हद्दपार आरोपीने पाेलिस ठाण्याच्या आवारातूनच चोरला ट्रॅक्टर
बीड : पोलिस ठाण्याच्या आवारात जप्त करून ठेवलेला वाळूने भरलेला ट्रॅक्टर थेट हद्दपार केलेल्या आरोपीने चोरून नेल्याची अत्यंत धक्कादायक घटना शिरूर कासार येथे उघडकीस आली आहे. हा प्रकार वेळीच निदर्शनास आल्याने आरोपीला ट्रॅक्टरसह ताब्यात घेतले असले तरी, या घटनेमुळे पोलिसांच्या कारभारावर आणि गुन्हेगारांवरील वचकवर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेष म्हणजे, याच पोलिस ठाण्यात मागील आठवड्यात एका पीडितेच्या आईला मदत न केल्याचा प्रकारही घडला होता.
१ डिसेंबर रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास, हद्दपार केलेला आरोपी दीपक आनंदा तळेकर (वय ३७, रा. फुलसांगवी, ता. शिरूर कासार) हा जुन्या शिरूर कासार पोलिस ठाण्याच्या आवारातून जप्त केलेला ट्रॅक्टर घेऊन जात होता. याची माहिती पोलिसांना मिळताच, त्याला सिद्धेश्वर चौकात ताब्यात घेण्यात आले. त्याने हा ट्रॅक्टर चौघांच्या मदतीने चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून ट्रॅक्टर, ट्रॉली आणि वाळूसह एकूण ६ लाख ५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या प्रकरणात सहायक फौजदार राम यादव यांच्या फिर्यादीवरून शिवाजीनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, आरोपी सध्या पोलिस कोठडीत असल्याचे सांगण्यात आले. या घटनेबाबत बाजू समजून घेण्यासाठी सहायक पोलिस निरीक्षक प्रवीण जाधव यांना वारंवार संपर्क करूनही त्यांनी कॉल न घेतल्याने त्यांची बाजू समजली नाही. पोलिस ठाण्यात एकाच आठवड्यात घडलेल्या या दोन प्रकारांमुळे शिरूर कासार पोलिस ठाण्याच्या कारभारावर नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे.
पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह
सर्वात गंभीर बाब म्हणजे, आरोपी दीपक तळेकर याला १३ मार्च २०२५ रोजी चकलांबा पोलिसांच्या प्रस्तावानंतर बीड जिल्ह्याच्या कार्यक्षेत्रातून एक वर्षाच्या कालावधीकरिता हद्दपार केले होते. असे असतानाही तो केवळ जिल्ह्यात उपस्थित राहिला नाही, तर थेट पोलिस ठाण्याच्या आवारातील जप्त मुद्देमालाची चोरी करत असल्याने पोलिसांच्या वचकवर प्रश्न उपस्थित केला जात आहे.
पोलिसांची प्रतिमा मलीन
मागील काही दिवसांपासून बीड पोलिसांवरच आरोप होऊ लागले आहेत. यापूर्वी गेवराई ठाण्यातील कर्मचारी लाच घेताना पकडला. शिवाजीनगर ठाण्यातील सपोनि गजानन क्षीरसागर यांच्यावर सराफा व्यापाऱ्याकडून चार लाख रुपये घेतल्याचा आरोप झाला. त्यानंतर निवडणुकीतही राडा झाल्याने पोलिसांची प्रतिमा मलीन होऊ लागली आहे. त्यातच शिरूरमधील प्रकाराने आणखीनच भर टाकली आहे. जिल्ह्यात गुन्हेगारी वाढत असल्याने पोलिसांच्या कारभारावर प्रश्न उपस्थित केला जात आहे.