दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 13:19 IST2025-05-02T13:18:27+5:302025-05-02T13:19:14+5:30
Beed Crime: दोन्ही प्रकरणांमध्ये दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलांनीच आई आणि चुलतीचा जिव घेतल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.

दारूच्या व्यसनाने आई आणि चुलतीचा खून; बीड जिल्हा दोन हत्येच्या घटनांनी हादरला
बीड: दारूच्या नशेत आई आणि चुलतीची निर्घृण हत्या झाल्याच्या दोन वेगवेगळ्या घटनांनी संपूर्ण जिल्हा हादरून गेला आहे. अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा गावात मुलाने आईचा तर परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथे पुतण्याने चुलतीचा खून केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याने मुलांनीच आई आणि चुलतीचा जिव घेतल्याने नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे.
पहिली घटना : आईचा दगडाने ठेचून खून
अंबाजोगाई तालुक्यातील येल्डा येथे रात्री बारा वाजताच्या सुमारास अमृत भानुदास सोन्नर (वय 45) याने आपल्या आई चोत्राबाई भानुदास सोन्नर (वय अंदाजे 72) यांचा दारू पिण्यासाठी पैसे न दिल्याच्या कारणावरून वाद घालून दगडाने ठेचून खून केला. अमृतला दारूचे व्यसन होते, आणि काही दिवसांपूर्वी पत्नी व मुले त्याच्या त्रासाला कंटाळून माहेरी गेली होती. त्या रात्री आई व मुलगा दोघेच घरी असताना, अमृतने आईकडे पैसे मागितले. पैसे न दिल्याने त्याने रागाच्या भरात आईच्या अंगावर दगडांनी प्रहार केला. जबर मारहाणीमुळे रक्तस्त्राव होऊन वृद्धेचा जागीच मृत्यू झाला. अंबाजोगाई ग्रामीण पोलिसांनी अमृतला अटक केली आहे.
दुसरी घटना : कुन्हाडीने चुलतीची हत्या
दुसरी घटना परळी तालुक्यातील कावळ्याची वाडी येथे 1 मे रोजी संध्याकाळी 6 वाजता घडली. चंद्रकांत धुराजी कावळे (वय 25) याने आपल्या चुलती परिमाला बाबुराव कावळे (वय 65) यांच्याकडे दारूसाठी पैसे मागितले. पैसे न दिल्याने त्याने संतापून घरात असलेल्या कुन्हाडीने चुलतीवर सपासप वार केले. डोक्यावर आणि अंगावर गंभीर घाव झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. हत्या केल्यानंतर चंद्रकांतने घटनास्थळावरून पळ काढला. पोलिसांनी आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला असून त्याचा शोध सुरु आहे.
दारूमुळे गुन्हेगारी वाढली
या दोन घटनांमुळे बीड जिल्ह्यात खळबळ उडाली असून, दारू विक्री आणि व्यसनाधीनतेमुळे होणाऱ्या कुटुंबीयांवरील अत्याचारांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. ग्रामीण भागात बिनधास्त चालणारी दारू विक्री आणि तिच्याशी संबंधित गुन्हेगारी यामुळे अनेक गंभीर गुन्हे घडत आहेत.