गावातून अल्पवयीन मुलीला बळजबरीने उचलले; वासनेची शिकार बनवले! बीडमधील प्रकार
By सोमनाथ खताळ | Updated: October 1, 2025 20:22 IST2025-10-01T20:22:26+5:302025-10-01T20:22:26+5:30
आष्टी पोलिस ठाण्यात पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल; मुख्य आरोपीला अटक

गावातून अल्पवयीन मुलीला बळजबरीने उचलले; वासनेची शिकार बनवले! बीडमधील प्रकार
Beed Crime: आष्टी पोलिस ठाणे हद्दीतील एका गावातून १४ वर्षीय अल्पवयीन मुलीला बळजबरीने चारचाकी वाहनातून उचलून तिच्यावर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या गंभीर प्रकरणी आष्टी पोलिस ठाण्यात मंगळवारी पाच जणांविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
२५ सप्टेंबर रोजी मुख्य आरोपीने मित्रांच्या मदतीने या अल्पवयीन मुलीला तिच्या गावातून जबरदस्तीने चारचाकी वाहनातून प्रथम खडकत येथे नेले. त्यानंतर तिला पनवेल येथे नेऊन तिच्यावर अत्याचार करण्यात आला. अत्याचारानंतर २७ सप्टेंबर रोजी आरोपींनी मुलीला तिच्या गावात आणून सोडले. मुलीने घडलेला प्रसंग आई-वडिलांना सांगितल्यानंतर त्यांनी २९ सप्टेंबर रोजी आष्टी पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दाखल केली.
या प्रकरणी अत्याचार करणारा मुख्य आरोपी पवन पोठरे (वय २४, रा. डोणगाव, ता. जामखेड, जि. अहमदनगर) याच्यासह त्याच्या चार साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी मुख्य आरोपी पवन पोठरे याला तत्काळ अटक केली आहे. पुढील तपास सहायक पोलिस निरीक्षक एन. बी. सूर्यवंशी आणि पोलिस अंमलदार सचिन पवळ हे करत आहेत.