Beed:'सिनेस्टाईल' लूट! धावत्या ट्रॅव्हल्सवर दुचाकीवरील चोरटे चढले, बॅगांची चोरी; प्रवासी भयभीत
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 8, 2025 15:55 IST2025-12-08T15:50:03+5:302025-12-08T15:55:02+5:30
बीड ते तुळजापूर पट्ट्यात प्रवासी भयभीत; व्हायरल व्हिडिओने पोलिसांचे अपयश उघड

Beed:'सिनेस्टाईल' लूट! धावत्या ट्रॅव्हल्सवर दुचाकीवरील चोरटे चढले, बॅगांची चोरी; प्रवासी भयभीत
बीड : बीड ते तुळजापूरदरम्यान धावणाऱ्या ट्रॅव्हल्समधील प्रवाशांना लुटण्याच्या घटना राष्ट्रीय महामार्ग ५२ वर वाढल्या असून, गुन्हेगारांनी अक्षरशः ‘सिनेस्टाईल’ पद्धत वापरून पोलिस प्रशासनाला थेट आव्हान दिले आहे. बीड आणि धाराशिव जिल्ह्यांच्या हद्दीत पोलिसांचा कोणताही धाक उरलेला नसल्याचे या प्रकारावरून स्पष्ट झाले आहे.
लुटमारीमध्ये चोरटे एका दुचाकीवरून ट्रॅव्हल्सच्या पाठीमागे येतात. त्यातील एक चोरटा धावत्या गाडीवरून ट्रॅव्हल्सच्या कॅरिअरवर चढतो आणि प्रवाशांच्या बॅगा खाली फेकून देतो. दुसऱ्या दुचाकीवरील साथीदार त्या बॅगा जमा करतात आणि चढ किंवा गतिरोधक आल्यावर वेग कमी होताच पसार होतात. या धाडसी पद्धतीचा कथित सीसीटीव्ही व्हिडिओ व्हायरल झाला असूनही, महामार्गावर त्वरित उपाययोजना करण्यात पोलिस अपयशी ठरले आहेत. या गंभीर घटनांमुळे प्रवासी चांगलेच भयभीत झाले आहेत. पोलिस आणि प्रशासनाच्या डोळ्यादेखत अशा टोकाच्या घटना घडत असल्याने, महामार्गावरील गस्त पूर्णपणे कुचकामी ठरल्याचे दिसत आहे. पोलिसांनी तातडीने कठोर कारवाई न केल्यास प्रवाशांवरील हल्ले थांबणार नाहीत, अशी भीती व्यक्त होत आहे.
महामार्गावर भाविकांची लूट
बीड जिल्ह्यात गुन्हेगारांनी पोलिसांना आव्हान देत दोन मोठ्या घटना घडवल्या. २४ नोव्हेंबर रोजी बळीराजा हॉटेलसमोर लग्नाहून परतणाऱ्या सोलापूरचे रहिवासी राजू राठी यांच्या गाडीतील १७ पैकी १० बॅगा चोरी झाल्या. या चोरीचा तपास अद्याप लागलेला नाही. दुसरीकडे, बुधवारी मध्यरात्री गेवराईजवळ राष्ट्रीय महामार्ग ५२ वर साईबाबांच्या दर्शनाला जाणाऱ्या तेलंगणा येथील भाविकांच्या कुटुंबाला लोखंडी रॉडचा धाक दाखवून लुटण्यात आले. चोरट्यांनी ३ लाख ४६ हजार रुपयांचे दागिने चोरले. या दोन्ही घटनांवरून बीडमध्ये गुन्हेगारांना पोलिसांचा कसलाही धाक उरलेला नसल्याचे स्पष्ट होते. यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. परंतू प्रवाशांनी तक्रार देण्यास टाळाटाळ केल्याचे सांगण्यात आले.
पोलिसांनी जाहीर केलेली धोकादायक ठिकाणे
बीड व धाराशिव पोलिसांनी १० धोकादायक ठिकाणांची यादी व्हायरल केली आहे. यात मांजरसुंबा घाट (बीड), चौसाळा बायपास, पारगाव बायपास, सरमकुंडी फाटा, इंदापूर फाटा, पार्डी फाटा, घुले माळ जवळील उड्डाणपूल, तेरखेडा ते येडशी टोल नाका, येडशी बायपास आणि धाराशिव ते तुळजापूर या प्रमुख भागांचा समावेश आहे.
गुन्हा दाखल
बॅग चोरीचा गुन्हा दाखल झालेला आहे; परंतु त्यातील आरोपी अद्याप सापडलेले नाहीत.
- अशोक मुदिराज, पोलिस निरीक्षक, बीड ग्रामीण ठाणे