Beed: केज हादरलं! कारमध्ये सापडलं शस्त्रांचं भांडार; ५ अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2026 17:45 IST2026-02-07T17:44:25+5:302026-02-07T17:45:02+5:30
केज पोलिसांनी उधळला दरोड्याचा कट; ५ आरोपींना शस्त्रास्त्रांसह रंगेहात पकडले

Beed: केज हादरलं! कारमध्ये सापडलं शस्त्रांचं भांडार; ५ अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या
मधुकर सिरसट
केज (बीड): शुक्रवारी पहाटेच्या वेळी जेव्हा संपूर्ण जिल्हा गाढ झोपेत होता, तेव्हा युसूफवडगाव पोलिसांनी आपल्या सतर्कतेने एका मोठ्या दरोड्याचा कट उधळून लावला आहे. सावळेश्वर शिवारात महामार्गावर गस्तीवर असलेल्या पोलिसांनी एका लाल रंगाच्या कारला संशयावरून अडवले आणि त्यातून दरोड्याचे भयंकर साहित्य जप्त करत ५ अट्टल दरोडेखोरांच्या मुसक्या आवळल्या.
सावळेश्वर ते अंबाजोगाई या महामार्गावर पहाटे साडेतीनच्या सुमारास एक लाल रंगाची एक कार (MH-14 CK-7917) संशयास्पद रितीने धावताना गस्ती पथकाला दिसली. पोलिसांनी गाडी थांबवून विचारपूस केली असता, गाडीतील तरुणांच्या बोलण्यात विसंगती आढळली. पोलिसांनी गाडीची सखोल झडती घेतली असता, त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. गाडीत दरोडा टाकण्यासाठी लागणारे शस्त्रास्त्रांचे भांडार सापडले.
शस्त्रास्त्रांचा मोठा साठा जप्त
या कारवाईत पोलिसांनी महादेव काळे, रितेश काळे, सुरेश शिंदे, रमेश पवार आणि बालाजी शिंदे (सर्व रा. ता. वाशी, जि. धाराशिव) यांना ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून ४ लाख रुपये किमतीची कार, धारदार तलवार, कोयता, लोखंडी गज, रॉड आणि इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
पोलीस कोठडीत मोठी माहिती मिळण्याची शक्यता
जमादार अनिल बिक्कड यांच्या फिर्यादीवरून युसूफवडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शुक्रवारी या पाचही आरोपींना केज न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्यांना ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. या टोळीने यापूर्वी कुठे दरोडे टाकले आहेत किंवा त्यांचा पुढचा निशाणा कोण होता, याचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्र शेंडगे करत आहेत.