१ गुंठा जमिनीसाठी सख्खे भाऊ झाले पक्के वैरी; दोन गटात तुंबळ हाणामारी, ६ जणांवर गुन्हे दाखल
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 19:38 IST2026-03-25T19:37:35+5:302026-03-25T19:38:53+5:30
भाऊबंदकीच्या वादात जमिनीचे छोटे तुकडे मिळवताना कुटुंबातील प्रेम हरवत चालले आहे का?

१ गुंठा जमिनीसाठी सख्खे भाऊ झाले पक्के वैरी; दोन गटात तुंबळ हाणामारी, ६ जणांवर गुन्हे दाखल
केज (जि. बीड): तालुक्यातील डिघोळअंबा शिवारातील सर्व्हे नं. २८३ मधील अवघ्या १ गुंठ्याच्या भूखंडासाठी दोन सख्ख्या भावांमध्ये रक्ताचा संघर्ष झाला आहे. जमिनीच्या वादातून दोन गट आमनेसामने आल्याने लोखंडी पाईप आणि लाकडी काठ्यांनी एकमेकांवर हल्ला चढवला. या तुंबळ हाणामारीत दोन्ही गटाचे ४ जण गंभीर जखमी झाले असून, युसूफ वडगाव पोलिसांनी परस्परविरोधी तक्रारीवरून दोन्ही कुटुंबातील ६ जणांवर गुन्हे दाखल केले आहेत.
दोन्ही गटाचे सदस्य जखमी
सोमवारी (दि. १६) घुंडरे कुटुंबातील हा वाद विकोपाला गेला. यात एका गटाचे रोहिदास रामभाऊ घुंडरे आणि त्यांची पत्नी आशाबाई, तर दुसऱ्या गटाचे संभाजी रामभाऊ घुंडरे आणि त्यांचा मुलगा विजय हे चौघे जण जखमी झाले. जखमींवर अंबाजोगाई येथील 'स्वाराती' रुग्णालयात उपचार सुरू असल्यामुळे फिर्याद देण्यास उशीर झाला. मात्र, पोलिसांनी गुन्हा दाखल होताच वेगाने हालचाली केल्या.
अख्खं कुटुंब पोलीस कोठडीत
सहाय्यक पोलीस निरीक्षक मच्छिंद्रनाथ शेंडगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सहाही आरोपींना अटक करून मंगळवारी केज न्यायालयासमोर हजर केले. न्यायालयाने या सहाही जणांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. अवघ्या १ गुंठ्याच्या तुकड्यासाठी आता दोन्ही भावांची कुटुंबे पोलीस कोठडीची हवा खात असून, गावात या घटनेची मोठी चर्चा सुरू आहे.