Beed: वाळू वाहतुकीसाठी लाच घेताना हवालदाराला पकडले अन् लगेच ठाणेदाराची उचलबांगडी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2025 17:48 IST2025-09-03T17:48:03+5:302025-09-03T17:48:28+5:30
या कारवाईनंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तातडीने पाटोदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांची उचलबांगडी केली.

Beed: वाळू वाहतुकीसाठी लाच घेताना हवालदाराला पकडले अन् लगेच ठाणेदाराची उचलबांगडी
बीड : वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी दरमहा २० हजार रुपयांचा हप्ता मागणाऱ्या पाटोदा पोलिस ठाण्यातील हवालदार सचिन तांदळे याला सोमवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) रंगेहाथ पकडले. या कारवाईनंतर पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी तातडीने पाटोदा पोलिस ठाण्याचे निरीक्षक सोमनाथ जाधव यांची उचलबांगडी केली. त्यांच्या जागी सहायक पोलिस निरीक्षक संतोष तागड यांच्याकडे तात्पुरता पदभार सोपविण्यात आला आहे.
एका वाळू वाहतूकदाराने तक्रार दिल्यानंतर एसीबीने सापळा रचला होता. ठरल्याप्रमाणे, हवालदार तांदळे याने २० हजार रुपयांची लाच स्वीकारताच एसीबीच्या पथकाने त्याला अटक केली. या कारवाईमुळे पोलिस दलातील हप्तेखोरीचा प्रकार पुन्हा एकदा समोर आला आहे. या गंभीर प्रकरणाची दखल घेत पोलिस अधीक्षकांनी कठोर पाऊल उचलले. ठाणेदारावर थेट कारवाई केल्याने पोलिस दलात शिस्तीचा संदेश गेला आहे. हवालदार तांदळे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिस निरीक्षक जाधव यांच्या बदलीमुळे पाटोदा पोलिस ठाण्याच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. लाचेचा सापळा उपअधीक्षक सोपान चिट्टमपल्ले यांच्या पथकाने लावला होता.
२० हजार रुपयांची लाच घेताना पोलिस हवालदार रंगेहाथ
एका टिप्परमालकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दाखल केली होती. पाटोदा तालुक्यातून वाळू वाहतूक सुरू ठेवण्यासाठी हवालदार सचिन तांदळे याने तक्रारदाराकडे २० हजार रुपयांची लाच मागितली होती. तक्रारीची पडताळणी केल्यानंतर, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचला. सोमवारी सायंकाळी ही रक्कम स्वीकारताना तांदळे यांना रंगेहाथ पकडण्यात आले. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या या कारवाईमुळे पोलिस दलात खळबळ उडाली आहे. पुढील तपास सुरू असून, या प्रकरणात आणखी कोणाचा सहभाग आहे का, याचा शोध घेतला जात आहे.
२०२५ मधील पहिली कारवाई
२०२५ या वर्षांत पोलिस विभागात पहिल्यांदाच एसीबीची कारवाई झाली आहे. नवनीत काँवत यांनी पदभार घेताच लाच घेणाऱ्यांना कडक इशारा दिला होता. सोबतच कर्मचारी अडकला तरी ठाणेदारांची उचलबांगडी करणार, असा दम दिला होता. आता पाटोदा ठाण्यातील कर्मचारी पकडल्याने ठाणेदारावरही कारवाई होणार का? याकडे लक्ष लागले आहे.