बीड शहराचे वैभव ‘बिंदुसरा, कर्परा’ नद्या सांडपाण्यामुळे प्रदूषित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2019 19:41 IST2019-12-26T19:39:07+5:302019-12-26T19:41:02+5:30

दररोज सव्वा दोन कोटी घाण पाणी जाते नद्यांच्या पात्रात

The Beed city's glory 'Bindusara, Karpara' rivers polluted by sewage | बीड शहराचे वैभव ‘बिंदुसरा, कर्परा’ नद्या सांडपाण्यामुळे प्रदूषित

बीड शहराचे वैभव ‘बिंदुसरा, कर्परा’ नद्या सांडपाण्यामुळे प्रदूषित

ठळक मुद्देसर्वत्र घाणीचे साम्राज्य खड्डे खोदून ठेवल्याने नदीपात्र धोकादायक

बीड : शहराचे वैभव असणाऱ्या बिंदुसरा व कर्परा या दोन नद्यांमध्ये शहरातून निघणारे सर्व सांडपाणी सोडले जात आहे. त्यामुळे या नद्यांचे पात्र दूषित झाले आहे. तसेच पात्राची स्वच्छता केली जात नसल्याने सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे. पालिकेच्या माहितीनुसार दररोज २ कोटी २० लक्ष लिटर सांडपाणी बीड शहरातून बाहेर पडत असल्याचे सांगण्यात आले. हे सर्व पाणी दोन नद्यांमध्ये सोडले जाते.

बीड शहरातून बिंदुसरा व कर्परा या दोन नद्या वाहतात. अतिक्रमणे, कचरा आदी कारणांमुळे आगोदरच पात्र अरूंद झालेले आहेत. त्यामुळे पुर आल्यावर पाणी शहरात येते. सध्या बीड शहरातून दररोज २२ एमएलडी सांडपाणी दोन नद्यांमध्ये येते. दोन्ही नद्या वाहत्या नसल्याने या पाण्यांचे डोह साचत आहेत. त्यामुळे पात्र घाण होऊन सर्वत्र मोठ्या प्रमाणावर दुर्गंधी पसरत आहे. या संदर्भात बीड  पालिकेकडून नदी पात्राची स्वच्छता केली जात नाही. बार्शी नाका परिसरात तर अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे खोदून ठेवलेले आहेत. त्यामुळे नदीपात्र धोकादायक झाले आहे. याकडे कोणाचेही लक्ष नसल्याने संताप व्यक्त होत आहे. दोन्ही नद्यांचे पात्र स्वच्छ करुन सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्याची मागणी बीडकरांमधून होत आहे.

भुयारी गटार योजनेचे काम संथ
बीड शहरात भुयारी गटार योजनेच्या कामाला जुलै २०१८ पासून सुरूवात झाली. एकूण १६५ कोटी रूपयांचा निधी असलेले हे काम १६३ किलोमिटरचे आहे. दोन वर्षात हे काम पूर्ण होणे अपेक्षित आहे. मात्र, आतापर्यंत केवळ ३० किमी काम पूर्ण झाल्याने पालिकेकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळेच सांडपाणी नद्यांमध्ये जात आहे.

नागरिकांचे आरोग्य धोक्यात
बीड शहरात नाल्या, रस्ते आदी समस्या आहेत. त्यामुळे सांडपाण्याची व्यवस्थित विल्हेवाट लागत नाही. मार्ग मिळत नसल्याने ठिकठिकाणी सांडपाणी साचत आहे. घाणीचे साम्राज्य पसरत आहे. डासांची उत्पत्ती होऊन साथरोगांना निमंत्रण मिळत आहे. याचा परिणाम नागरिकांच्या आरोग्यावरही होत असल्याचे दिसत आहे.

बीड शहरात भुयारी गटार योजनेचे काम सुरू आहे. सध्या शहरात दररोज २२ एमएलडी सांडपाणी बाहेर येते. 
- राहुल टाळके, अभियंता, पाणी पुरवठा न.प.बीड

Web Title: The Beed city's glory 'Bindusara, Karpara' rivers polluted by sewage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.