Beed: अपहरण करून दारू पाजत मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2025 15:20 IST2025-05-22T15:16:53+5:302025-05-22T15:20:02+5:30
या प्रकरणी चौघांविरोधात बुधवारी पहाटे माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Beed: अपहरण करून दारू पाजत मारहाण करणाऱ्या चौघांविरोधात गुन्हा
बीड : कारच्या काचा फोडल्याच्या संशयावरून अप्पा राठोड (रा. जीवणापूर, ता. माजलगाव) या व्यक्तीचे अपहरण करून बेदम मारहाण केली होती. या प्रकरणी चौघांविरोधात बुधवारी पहाटे माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
ज्ञानेश्वर राठोड, रमेश जयराम पवार, राहुल मधुकर राठोड व अनोळखी एक (सर्व रा. माजलगाव) अशी आरोपींची नावे आहेत. १८ मे रोजी गावी जाताना अप्पा यांना चहा पाजतो, असे म्हणत दोघांनी दुचाकीवरून ढाब्यावर नेले. तेथे रमेश पवारसह चौघांनी त्यास दारू पाजून मारहाण केली. त्यानंतर जीपमधून वेगवेगळ्या ठिकाणी नेत मारहाण केली होती. यात अप्पा यांच्या डोक्याला सात टाके पडले होते. शिवाय अंगावरही सर्वत्र व्रण होते. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू होते. मंगळवारी माजलगाव ग्रामीण पोलिसांनी जबाब घेतला. त्यानंतर बुधवारी पहाटेच्या सुमारास चौघांविरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
काच फोडल्याचा राग
अप्पा राठोड यांनी कारची काच फोडली, असा संशय रमेश पवार याला होता. त्यामुळेच त्याने दोन दिवसांपूर्वी त्यांना शिवीगाळ केली होती. त्यानंतर आता त्याचाच राग धरून मारहाण केल्याचे अप्पा यांनी तक्रारीत म्हटले आहे. नुकसानभरपाई देतो, असे म्हटल्यावरही मारहाण करीतच राहिल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.