Beed: दुर्दैवी! कारने दोनशे फूट फरफटत नेले, आईचा मुलाच्या डोळ्यासमोर मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 7, 2025 17:41 IST2025-04-07T17:40:24+5:302025-04-07T17:41:22+5:30
दिवसभर सोबत, दोन मिनिटात काळाची झडप; आष्टी-डोईठाण रोडवरील चिंचाळा येथील घटना

Beed: दुर्दैवी! कारने दोनशे फूट फरफटत नेले, आईचा मुलाच्या डोळ्यासमोर मृत्यू
कडा : दुचाकी रोडच्या बाजूला थांबवून मुलगा लघुशंकेसाठी गेला होता. आई दुचाकीजवळ थांबलेली असताना आष्टीकडून देसुरकडे भरधाव येणाऱ्या कारने तिला चिरडत दोनशे फुट अंतरापर्यंत ओढत नेले. या अपघातात तिचा जागीच मृत्यू झाला. ही घटना आष्टी- डोईठाण रोडवरील चिंचाळा येथे घडली. कमलाबाई रघुनाथ मोरे (वय ५०) असे मृत महिलेचे नाव आहे.
आष्टी तालुक्यातील बीडसांगवी येथील कमलाबाई रघुनाथ मोरे ही महिला रविवारी मुलासोबत दुचाकीवरून (क्र. एमएच २३, बीबी ३५१०) पाहुण्याचा साखरपुड्याच्या कार्यक्रमाला गेली होते. कार्यक्रम आटोपून मायलेक दुचाकीवरून घराकडे निघाले होते. दरम्यान, चिंचाळा परिसरात मुलगा दुचाकी थांबवून लघुशंकेसाठी गेला होता. तर कमलबाई दुचाकीजवळ थांबल्या होत्या. याच दरम्यान आष्टीकडून देसूरकडे जाणाऱ्या भरधाव कारने (एम.एच २३, ए.एस. ३०७०) कमलबाईला धडक दिली. या अपघातानंतर दुचाकीसह दोनशे फुट अंतरापर्यंत ओढत नेले. यावरून कार अतिवेगात आणि चालक धुंदीत असल्याचे दिसून येते. या अपघातात महिलेचा जागीच मृत्यू झाल्याची घटना रविवारी सायंकाळी सहाच्या दरम्यान घडली.
दिवसभर सोबत, दोन मिनिटात काळाची झडप
दिवसभर सोबत असलेल्या आईपासून मुलगा दोन मिनिटे लांब गेला आणि काळाने झडप घालत मिनिटात होत्याचं नव्हत झालं. डोळ्यादेखतच आईचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली.