Beed: पाण्यासाठी सख्ख्या भावांनी उपसल्या कुऱ्हाडी! दोन गटांत रक्तरंजित संघर्ष, ८ जणांवर गुन्हे
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2025 14:03 IST2025-12-19T14:03:11+5:302025-12-19T14:03:37+5:30
येवत्यात दोन सख्खे भाऊ कुऱ्हाड-कत्तीनिशी भिडले; ८ जणांवर गुन्हा

Beed: पाण्यासाठी सख्ख्या भावांनी उपसल्या कुऱ्हाडी! दोन गटांत रक्तरंजित संघर्ष, ८ जणांवर गुन्हे
- मधुकर सिरसट
केज (बीड): विहिरीच्या पाण्यावरून दोन सख्या भावांमध्ये जुंपलेल्या वादाचे रूपांतर रक्तरंजित संघर्षात झाल्याची धक्कादायक घटना केज तालुक्यातील येवता येथे घडली आहे. सख्या भावांनी एकमेकांविरुद्ध कुऱ्हाड, कत्ती आणि काठ्यांचा वापर केल्याने दोन्ही गटातील लोक जखमी झाले आहेत. याप्रकरणी केज पोलिसांनी दोन्ही बाजूंच्या एकूण ८ जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले असून परिसरात या घटनेची मोठी चर्चा आहे.
येवता येथील मल्हारी लक्ष्मण सक्राते (५३) यांच्या फिर्यादीनुसार, बुधवारी सायंकाळी साडेसहाच्या सुमारास ते शेतात असताना त्यांचा सख्खा भाऊ अशोक सक्राते आणि त्याच्या मुलांनी तेथे येऊन वाद घातला. "विहीर आमची आहे, मोटार चालू करू नकोस," असे म्हणत त्यांनी शिवीगाळ केली. "आपण पाळीने (बारीने) पाणी घेऊ" असे मल्हारी यांनी सुचवले असता, रागाच्या भरात अशोकने कुऱ्हाडीने मल्हारी यांच्या डोक्यात वार करून त्यांना गंभीर जखमी केले. याप्रकरणी अशोक सक्राते, प्रणव, समाधान आणि शिवकन्या या चौघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
दुसरीकडे, दुसऱ्या गटाचे प्रणव अशोक सक्राते यांनीही फिर्याद दिली आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, ते विहिरीवर मोटार चालू करण्यास गेले असता त्यांचे चुलते मल्हारी सक्राते, दीपक, प्रवीण आणि शारदा सक्राते यांनी त्यांना अडवले. यावेळी झालेल्या वादात चुलते मल्हारी सक्राते यांनी धारदार कत्तीने प्रणवच्या हातावर वार करून त्याला जखमी केले, तर इतरांनी दगडाने मारहाण केली. या तक्रारीवरून मल्हारी सक्राते यांच्यासह चौघांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
नात्यापेक्षा 'पाणी' ठरले मोठे?
एकदा विहिरीच्या पाण्यावरून हा वाद विकोपाला गेल्याने दोन सख्खी कुटुंबं आता पोलीस ठाण्याची पायरी चढली आहेत. पोलिसांनी दोन्ही गटांविरुद्ध परस्परविरोधी गुन्हे दाखल केले असून जमादार हनुमान मुंडे या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत. या घटनेमुळे ग्रामीण भागात पाण्यासाठी नाती कशी दुरावत चालली आहेत, याचे विदारक चित्र समोर आले आहे.