Beed: मोठी बातमी! गेवराई राडाप्रकरणी भाजप नेते बाळराजे पवारांसह ५ जणांना अटक
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 16, 2025 18:03 IST2025-12-16T18:02:28+5:302025-12-16T18:03:17+5:30
नगर परिषद निवडणुकीतील राडाप्रकरणी गुन्हा दाखल; माजी आमदार अमरसिंह पंडितांच्या पीएला मारहाण प्रकरण

Beed: मोठी बातमी! गेवराई राडाप्रकरणी भाजप नेते बाळराजे पवारांसह ५ जणांना अटक
बीड (गेवराई): गेवराई नगर परिषद निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी (दि. २ डिसेंबर) भाजप आणि राष्ट्रवादी (अजित पवार गट) समर्थकांमध्ये झालेल्या राजकीय राड्याप्रकरणी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. या राड्यात थेट माजी आमदार अमरसिंह पंडित यांच्या कृष्णाई निवासस्थानात घुसून त्यांच्या स्वीय सहायक अमृत डावकर यांना मारहाण केल्याच्या आरोपाखाली भाजप नेते बाळराजे पवार यांच्यासह पाच जणांना सोमवारी रात्री अटक करण्यात आली आहे.
राजकीय राड्याचे हिंसक स्वरूप
गेवराई नगर परिषद निवडणुकीदरम्यान प्रभाग क्रमांक ११ मधील एका मतदान केंद्राजवळ किरकोळ वादातून दोन्ही गटांत मारामारी सुरू झाली होती, ज्यामुळे शहरातील वातावरण चांगलेच तापले होते. या वादाला हिंसक वळण लागले. भाजप नेते बाळराजे पवार आणि त्यांच्या साथीदारांनी थेट अमरसिंह पंडित यांच्या 'कृष्णाई' निवासस्थानी घुसून त्यांचे स्वीय सहायक अमृत डावकर यांना मारहाण केली.
पंडित गटाचा प्रतिहल्ला
यानंतर संतप्त झालेल्या राष्ट्रवादीच्या जयसिंग पंडित आणि पृथ्वीराज पंडित यांच्यासह इतरांनी माजी आमदार लक्ष्मण पवार यांच्या घरासमोर जाऊन गाडीची तोडफोड केली, ज्यामुळे दोन्ही गट पुन्हा एकदा आमने-सामने आले होते. या संपूर्ण प्रकरणाची गंभीर दखल घेत पोलिसांनी स्वतःहून घेतली. पोलीस रामराम आघाव यांच्या फिर्यादीवरून दोन्ही गटातील ४० ते ५० जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला होता.
बाळराजे पवारांसह ५ जणांना अटक
'कृष्णाई निवासस्थानात घुसून मारहाण' या गंभीर आरोपाखाली पोलिसांनी सोमवारी रात्री १०:०० वाजण्याच्या सुमारास कारवाई केली. तपासादरम्यान पोलिसांनी बाळराजे पवार यांच्यासह अरुण पवार, महेश खंडागळे, अमर मिसाळ आणि नोमान फारुकी यांच्याविरोधात कलम ३३३ (सरकारी कर्मचाऱ्याला कर्तव्यापासून परावृत्त करण्यासाठी दुखापत करणे) आणि ११८ (१) (सार्वजनिक शांतता भंग करणे) ही गंभीर कलमे वाढवली. या कलमांखाली गेवराईतून या पाच जणांना अटक करण्यात आली. त्यांना मंगळवारी सकाळी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने एका दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.