Beed: 'स्कीम' मधून जादा परतावा तर सोडा बीडच्या विमा प्रतिनिधीने गुंतवलेले २१ लाख ही गेले
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 13:33 IST2025-11-11T13:31:31+5:302025-11-11T13:33:04+5:30
पुण्याच्या आरोपीकडून बीडच्या प्रतिनिधीची मोठी गुंतवणूक

Beed: 'स्कीम' मधून जादा परतावा तर सोडा बीडच्या विमा प्रतिनिधीने गुंतवलेले २१ लाख ही गेले
बीड : एका गुंतवणुकीच्या स्किममध्ये जादा परताव्याचे आमिष दाखवून बीड शहरातील एका विमा प्रतिनिधीची तब्बल २१ लाख ३० हजार रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी बीड शहर पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
अण्णासाहेब राठोड (रा. बंगाली पिंपळा, माळीवेस, बीड) असे फसवणूक झालेल्या विमा प्रतिनिधीचे नाव आहे. राठोड यांची ओळख कुणाल भाऊसाहेब चव्हाण (रा. चासनळी, जि. अहिल्यानगर; सध्या रा. पुणे) या व्यक्तीसोबत झाली होती. कुणाल चव्हाण याने अण्णासाहेब राठोड यांना एका विशिष्ट स्किममध्ये पैसे गुंतवल्यास जादा परतावा मिळेल, असे आमिष दाखवले. तसेच, विमानाचे तिकीट काढून देण्याचेही सांगितले. कुणालच्या बोलण्यावर विश्वास ठेवून राठोड यांनी २७ डिसेंबर २०२४ पासून त्याच्याकडे गुंतवणूक करण्यास सुरुवात केली. ४ जून २०२५ पर्यंत राठोड यांनी कुणालकडे एकूण २१ लाख ३० हजार रुपयांची गुंतवणूक केली होती.
मात्र, नंतर कुणाल याने सांगितल्याप्रमाणे कोणताही परतावा दिला नाही आणि मुद्दल रक्कमही परत केली नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर अण्णासाहेब राठोड यांनी बीड शहर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. पोलिसांनी या तक्रारीवरून गुन्हा नोंद केला असून, या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत. अशा फसवणाऱ्या आमिषांपासून नागरिकांनी सावध राहण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.