Beed: धारूर घाटात पुन्हा बळी; टेम्पो-दुचाकीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2025 13:14 IST2025-09-22T13:14:12+5:302025-09-22T13:14:43+5:30
धारूर घाट अनेक वर्षांपासून अपघातप्रवण ठरत असून, स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या आहेत.

Beed: धारूर घाटात पुन्हा बळी; टेम्पो-दुचाकीच्या भीषण अपघातात एकाचा मृत्यू, एक जखमी
धारूर (बीड): धारूर घाट पुन्हा एकदा भीषण अपघाताचे साक्षीदार ठरले. मंगळवार, २२ सप्टेंबर रोजी सकाळी सुमारे अकरा वाजता टेम्पो आणि दुचाकीमध्ये झालेल्या धडकेत एका युवकाचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, धारूर तालुक्यातील कोळपिंपरी येथील जाधव यांचा टेम्पो माजलगावच्या दिशेने जात असताना समोरून येणाऱ्या दुचाकीला धडकला. दुचाकीवर तालुक्यातील मुंगी गावचे मुंजाभाऊ धर्मराज सोळुंके आणि रमेश मोरे हे दोघे प्रवास करत होते. या अपघातात सोळुंके यांचा जागीच मृत्यू झाला, तर रमेश मोरे गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने धारूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करून प्राथमिक उपचारानंतर अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले.
धारूर घाट अनेक वर्षांपासून अपघातप्रवण ठरत असून, स्थानिक नागरिकांनी वारंवार प्रशासन आणि लोकप्रतिनिधींकडे तक्रारी केल्या आहेत. घाट दुरुस्तीच्या कामासाठी कोट्यवधी रुपयांची मंजुरी मिळूनही प्रत्यक्ष कामाला सुरुवात झालेली नाही. परिणामी, प्रवाशांना जीव धोक्यात घालून या घाटातून प्रवास करावा लागत आहे. या ताज्या अपघातामुळे प्रशासनाच्या निष्क्रियतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.