Beed: अपघाताने क्रूर धंदा उघड! महागड्या कारमधून १५ वासरांची कत्तलीसाठी तस्करी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 7, 2025 13:06 IST2025-10-07T13:05:34+5:302025-10-07T13:06:06+5:30
कत्तलीसाठी जात होती १५ नवजात वासरे; महागड्या कारचा अपघात होताच गोमाफीयांचा क्रूर धंदा उघड!

Beed: अपघाताने क्रूर धंदा उघड! महागड्या कारमधून १५ वासरांची कत्तलीसाठी तस्करी
- नितीन कांबळे
कडा (बीड): बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. अहिल्यानगर-बीड राष्ट्रीय महामार्गावरील शेरी बुद्रुक येथे मंगळवारी सकाळी झालेल्या एका भीषण अपघातामुळे नवजात वासरांच्या कत्तलीसाठी होणारी क्रूर तस्करी उघड झाली आहे. अपघातात सापडलेल्या महागड्या कारमध्ये १५ निष्पाप वासरे अत्यंत अमानुषपणे कोंबून नेली जात होती.
मंगळवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास (एम.एच २०,बी.क्यू.३२३२) क्रमांकाची एक महागडी कार अहिल्यानगरहून परळीच्या दिशेने जात असलेल्या दुसऱ्या एका चारचाकी वाहनाला पाठीमागून धडकली. धडक एवढी जोरदार होती की, वासरांची तस्करी करणारी कार थेट रस्त्यालगत असलेल्या शुभम रमेश रासकर यांच्या शेडमध्ये घुसली. अपघात होताच परिसरातील नागरिकांनी धाव घेतली. अपघातग्रस्त कारची पाहणी केली असता आतमध्ये जे दृश्य दिसले, त्याने उपस्थितांचे हृदय हेलावले. कारमध्ये १५ नवजात वासरे निर्दयपणे कोंबलेली होती. त्यांच्या तोंडाला टेप लावली होती आणि पळून जाऊ नये म्हणून पाय बांधलेले होते.
नागरिकांची तत्परता आणि पोलिसांची धाव
अपघातग्रस्त वासरांना नागरिकांनी तात्काळ बाहेर काढण्यास सुरुवात केली. शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष दीपक सोनवणे, अशोक मुटकुळे, दादासाहेब सोनवणे, अजिनाथ सोनवणे यांच्यासह अनेक तरुणांनी वासरांच्या तोंडाची टेप आणि पाय बांधलेले दोर सोडले. यातील काही वासरांना गंभीर दुखापत झाली होती. घटनेची माहिती मिळताच कडा पोलीस चौकीचे पोलीस हवालदार भाऊसाहेब आहेर आणि अमोल नवले यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. पोलिसांनी पंचनामा करून वासरांना ताब्यात घेतले आहे. गोमाफीयांवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून, या वासरांना पुढील उपचारासाठी आणि सुरक्षिततेसाठी अहिल्यानगर जिल्ह्यातील गोशाळेत स्वाधीन करण्यात येणार आहे.
गोमाफीयांवर मकोका लावा
या घटनेनंतर गोमाफीयांच्या वाढत्या क्रूर कृत्यांवर संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत. शिवक्रांती सेनेचे युवक प्रदेश अध्यक्ष दीपक सोनवणे यांनी या तस्करीला आळा घालण्यासाठी कडक मागणी केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, "तालुक्यात यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या आहेत. बाहेरच्या जिल्ह्यातील गोमाफीया या रस्त्यावरून सुसाट जातात. अशा क्रूर गोमाफीयांवर आता 'मकोका' कायद्यांतर्गत कारवाई करण्यात यावी."