Beed: हॉटेल कामगार २० वर्षीय तरुणाने संपवले जीवन; सांगवी शिवारातील धक्कादायक घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 3, 2026 13:10 IST2026-01-03T13:09:08+5:302026-01-03T13:10:19+5:30
मृत्यूचं रहस्य मोबाईलमध्ये दडलंय? मयत तरुणाचे सीडीआर तपासण्याची ग्रामस्थांची मागणी

Beed: हॉटेल कामगार २० वर्षीय तरुणाने संपवले जीवन; सांगवी शिवारातील धक्कादायक घटना
कडा (आष्टी): आष्टी तालुक्यातील सांगवी (पाटण) शिवारात एका २० वर्षीय तरुणाने नदीकाठच्या झाडाला गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवल्याची हृदयद्रावक घटना शुक्रवारी रात्री समोर आली आहे. भाऊसाहेब ऊर्फ बावड्या राम खंडागळे (वय २०) असे मयत तरुणाचे नाव असून, त्याच्या मृत्यूचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.
काय आहे नेमकी घटना?
भाऊसाहेब हा तरुण गेल्या अनेक वर्षांपासून गावाजवळच एका हॉटेलवर कामगार म्हणून काम करत होता. त्याचे वडील भोळसर असल्याने चुलते त्यांना ऊसतोडीला सोबत नेतात, तर आई कधी पुण्यात तर कधी गावी असते. भाऊसाहेब स्वतः चुलत्याच्या घरी राहून कुटुंबाला आधार देत होता. शुक्रवारी तो गव्हाच्या पिकाला पाणी देण्यासाठी शेतात गेला होता. मात्र, रात्री उशिरापर्यंत तो घरी न परतल्याने चुलत भाऊ आणि नातेवाईकांनी शोध सुरू केला असता, घरापासून जवळच असलेल्या नदीकाठच्या झाडाला त्याने गळफास घेतल्याचे निदर्शनास आले.
मोबाईल सीडीआर तपासण्याची मागणी
घटनेची माहिती मिळताच आष्टी पोलीस ठाण्याचे हवालदार भाऊसाहेब आहेर यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. भाऊसाहेबने हे टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र, तो वापरत असलेल्या मोबाईलचे सीडीआर तपासल्यास मृत्यूचे गूढ उकलू शकेल, अशी मागणी नातेवाईक आणि ग्रामस्थांकडून केली जात आहे. सध्या मृतदेह शवविच्छेदनासाठी धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात पाठवण्यात आला असून आष्टी पोलिसांत आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.