विडा गावात जावयाची 'गदर्भस्वारी'! ३ तरुणांनी दिली हुलकावणी, ७० वर्षांचे आजोबा ठरले धूलिवंदनाचे मानकरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2026 19:45 IST2026-03-05T19:42:52+5:302026-03-05T19:45:45+5:30

सोन्याचे भाव नडले! विड्यात जावयाला यंदा अंगठी मिळाली नाही; ९० वर्षांच्या परंपरेत ७० वर्षांच्या जावयाचा मान

Beed: 70-Year-Old Son-in-Law Taken on Donkey Ride as Per 90-Year Tradition in Vida Village | विडा गावात जावयाची 'गदर्भस्वारी'! ३ तरुणांनी दिली हुलकावणी, ७० वर्षांचे आजोबा ठरले धूलिवंदनाचे मानकरी

विडा गावात जावयाची 'गदर्भस्वारी'! ३ तरुणांनी दिली हुलकावणी, ७० वर्षांचे आजोबा ठरले धूलिवंदनाचे मानकरी

- विनोद ढोबळे
विडा :
धूलिवंदनाच्या दिवशी गाढवावरून काढल्या जाणाऱ्या मिरवणुकीसाठी केज तालुक्यातील विडा गावात समितीला तब्बल तीन जावयांनी यंदा हुलकावणी दिली. शेवटी गावातीलच ७० वर्षांचे जावई शिवाजी गालफाडे यांना ताब्यात घेऊन त्यांची गाढवावरून पाच तास सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीनंतर गावातील हनुमान मंदिराच्या पारावर त्यांना कपड्यांचा पूर्ण आहेर भेट देण्यात आला. यंदा सोन्याचे भाव दीड लाखाच्या पुढे गेल्याने मिरवलेल्या जावयाला अंगठी मात्र मिळाली नाही.

विडा गावात ९० वर्षांपासून धूलिवंदनाच्या दिवशी जावयाची गाढवावरून मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. गावातील दगडू पवार यांचा जावई दुपारच्या जेवणासाठी घरी जात असताना भीतीने एका शेतात लपून बसला. याची माहिती गावच्या समितीला कळल्यानंतर समितीने त्याचा ३० किलोमीटर पेक्षा जास्त पाठलाग केला; परंतु तो हाती लागला नाही. तालुक्यातील शिंदी, येवता, घाटेवाडी या गावांतही समितीला जावई सापडले नाहीत. एक अज्ञात व्यक्तीने समितीला गावातील शेतात एक जावई लपून बसला असल्याचे सांगितले. समितीचे लोक आपल्याकडे येत असल्याचे पाहून घाटेवाडी येथील जावयाने दुचाकी सुरू करत तो पसार झाला. त्याला पकडताना विडा गावचे सरपंच सूरज पटाईत हे जखमी झाले.

७० वर्षांचे जावई शेवटी गावातच सापडले
जावयाचा शोध घेताना समितीची नजर गावातील बाबूराव दुनघव यांचे जावई असलेले शिवाजी गालफाडे यांच्यावर पडली. ते घरीच होते. विड्यात मागील ५० वर्षांपासून ते राहत असून त्यांचे वय ७० च्या घरात आहे. वयामुळे ते जागेवरून पळू शकले नाहीत. त्यांना पकडून ग्रामपंचायत कार्यालयात काही वेळ ठेवण्यात आले. धूलिवंदनाच्या दिवशी सकाळी दहा वाजता गाढवाच्या गळ्यात चप्पल-बुटाची माळ घालण्यात आली. मानकरी जावई शिवाजी दादाराव गालफाडे यांना गाढवावर बसवून ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीत सरपंच सूरज पटाईत, उपसरपंच सदाशिव वाघमारे, गोविंदा देशमुख, राजेभाऊ घोरपडे, महादेव पटाईत, रोहिदास ढोबळे, शिवाजी वाघमारे, दादा पटाईत, राजकुमार पटाईत सहभागी झाले होते.

वयाच्या सत्तरीत मी मानकरी ठरलो
माझं वय झाल्यामुळे मी पळू शकलो नाही. कोणीतरी जावई धरला असेल म्हणून मी गाफील राहिलो होतो. मला वाटलं कमिटीला माझा विसर पडला असेल; पण वयाच्या सत्तराव्या वर्षी मी मानकरी ठरलो.
- शिवाजी गालफाडे, धूलिवंदनाचे मानकरी जावई

Web Title : विडा में दूल्हे की गधे की सवारी; बुजुर्ग व्यक्ति बने सम्मानित अतिथि।

Web Summary : विडा में, तीन दूल्हे धूलिवंदन के दौरान पारंपरिक गधे की सवारी से बच गए। अंततः, 70 वर्षीय शिवाजी गालफाडे को चुना गया। उन्हें पांच घंटे तक गांव में घुमाया गया, फिर हनुमान मंदिर में कपड़े भेंट किए गए।

Web Title : Groom's donkey ride in Vida; elderly man becomes honored guest.

Web Summary : In Vida, three grooms evaded the traditional donkey ride during Dhulivandan. Ultimately, 70-year-old Shivaji Galphade was chosen. He was paraded through the village for five hours, then gifted clothes at the Hanuman temple.