Beed: माजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडले, सिंदफणेच्या पुराचा सांडस चिंचोलीला वेढा
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:51 IST2025-09-23T18:50:25+5:302025-09-23T18:51:03+5:30
माजलगाव धरणातून सिंदफणा नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे माजलगाव तेलगाव रस्त्यावर सिंदफणा नदीवरील जुन्या पुलावरून पाणी गेले.

Beed: माजलगाव धरणाचे ११ दरवाजे उघडले, सिंदफणेच्या पुराचा सांडस चिंचोलीला वेढा
माजलगाव : रविवारी रात्री झालेल्या जोरदार पावसामुळे माजलगाव धरणात सकाळपासून पाण्याची मोठी आवक वाढल्याने अकरा दरवाजे उघडावे लागले. सिंदफणा नदी पात्रात ८८ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. यामुळे मागील आठ दिवसात दुसऱ्यांदा सिंदफणा नदीवरील जुन्या पुलावरून पाणी जाऊ लागले आहे.
रविवारी रात्री सुरू झालेला पाऊस सोमवारी सकाळपर्यंत सुरू राहिल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. यापूर्वी शेतकऱ्यांची सोयाबीन व इतर पिके हातची गेली होती. आता या पावसामुळे राहिलेल्या पिकांना मोठा फटका बसला. माजलगाव धरणातून सिंदफणा नदीपात्रात पाणी सोडल्यामुळे माजलगाव तेलगाव रस्त्यावर सिंदफणा नदीवरील जुन्या पुलावरून पाणी गेले. हे पाणी पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती.
सिंदफणा नदीपात्रात मागील तीन आठवड्यांपासून माजलगाव धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. गोदावरी व सिंदफणा नदी पात्रात सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे माजलगाव तालुक्यातील सांडस चिंचोलीला या पाण्यामुळे सकाळी दहा वाजल्यापासून वेढा पडला आहे. यामुळे या गावातील नागरिकांचा संपर्क तुटला आहे.