राखेच्या टिप्परची धडक, सौंदना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2025 13:34 IST2025-01-12T13:34:20+5:302025-01-12T13:34:54+5:30
या अपघात प्रकरणी पोलिसांनी राखेचे टिप्पर पोलीस ठाण्यात आणून लावले आहे. रविवारी सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येत आहे.

राखेच्या टिप्परची धडक, सौंदना गावचे सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा जागीच मृत्यू
परळी : राखेच्या टिप्परच्या धडकेने मोटरसायकल वरील अंबाजोगाई तालुक्यातील सौंदना गावचे राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान सरपंच अभिमन्यू पांडुरंग क्षीरसागर (वय 45 ) यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना शनिवारी रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली. या अपघात प्रकरणी पोलिसांनी राखेचे टिप्पर पोलीस ठाण्यात आणून लावले आहे. रविवारी सकाळी येथील उपजिल्हा रुग्णालयात सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांच्या मृतदेहाची उत्तरीय तपासणी करण्यात येत आहे.
11 जानेवारी रोजी रात्री आठच्या सुमारास सौंदना येथील सरपंच अभिमन्यू क्षीरसागर हे परळी कडे घरी येण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते. त्यांना परळी तालुक्यातील मिरवट -मांडवा पाटी जवळ परळीहून धर्मापुरी कडे जाणाऱ्या राखेच्या एका टिप्परने धडक दिली. धडक जोराचे दिल्याने दुचाकी वरील सरपंचाचा खाली पडून मृत्यू झाला. ही घटना रात्री साडेआठ ते नऊच्या दरम्यान घडली. घटना कळताच परिसरातील ग्रामस्थ ही मदत कार्यासाठी धावून आले व परळी ग्रामीण पोलिसांना ही माहिती कळविण्यात आली.
परळी ग्रामीणचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रल्हाद जाधव, गोविंद बडे, वाहन चालक महादेव वाघमारे हे तातडीने घटनास्थळी पोहोचले व रात्री सरपंच अभिमन्यू क्षीरसागर यांचा मृतदेह परळी उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आला. सौंदना तालुका अंबाजोगाई येथे त्यांच्यावर रविवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. अभिमन्यू क्षीरसागर यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन भाऊ ,एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. सौंदना गावात त्यांचे घर व शेती आहे. शनिवारी शेतातील सोयाबीन भरून घेतले आणि टेम्पो ने घरी आणले. व दुचाकी वर एकटेच परळी कडे निघाले. परळीच्या जलालपूर भागात ही ते रहात होते. परळीला पोहचण्यापूर्वीच त्यांचा अपघात झाला. अभिमन्यू क्षीरसागर हे राष्ट्रवादी काँग्रेस ( अजित दादा पवार पक्षाचे )सौंदना गावचे सरपंच होते.