धारूर घाटामध्ये पुन्हा अपघात; टेम्पो- रिक्षाच्या धडकेत एकाचा मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2024 19:49 IST2024-05-31T19:48:42+5:302024-05-31T19:49:54+5:30
धारूर येथील घाटात धोकादायक वळणामुळे अपघाताचे सत्र सतत सुरूच आहे.

धारूर घाटामध्ये पुन्हा अपघात; टेम्पो- रिक्षाच्या धडकेत एकाचा मृत्यू
धारूर (बीड) : धारूर घाटामध्ये आज दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास टेम्पो व रिक्षाची समोरासमोर धडक झाली. यात रिक्षा चालक माऊली भास्कर घुले ( ३० रा . गावंदरा) याचा मृत्यू झाला.
धारूर येथील घाटात धोकादायक वळणामुळे अपघाताचे सत्र सतत सुरूच आहे. आज दुपारी धारूरकडून एक टेम्पो तेलगावकडे जात होता. यावेळी तेलगावकडून एक रिक्षा धारूरकडे येत होता. घाटातील धोकादायक वळणावर टेम्पो आणि रिक्षाची समोरसमोर धडक झाली. यात रिक्षाचालक माऊली भास्कर घुले गंभीर जखमी झाला. उपचारासाठी अंबाजोगाई येथे नेत असताना त्याचा मृत्यू झाला. अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा समोरील भाग चकाचूर झाला आहे. माऊली घुले यांच्यावर शुक्रवारी सायंकाळी अंत्यसंस्कार करण्यात आले. गावंदरा गावावर यामुळे शोककळा पसरली होती.
२४ तासांत दोन मृत्यू
धारूर घाटात अपघाताचे प्रमाण वाढले असून गुरुवारी रात्रीही एका दुचाकी आणि टिप्परचा अपघात झाला. यात एकाचा मृत्यू झाला. त्यानंतर आज पुन्हा एकाचा अपघातामध्ये एकाचा मृत्यू झाला. अवघ्या २४ तासांत घाटामध्ये अपघातामुळे दोघांचा बळी गेला आहे.