हल्लेखोरांमध्ये राजकीय विरोधकांसह अवैध धंदे करणारे; आमदार सोळंके यांचा खळबळजनक दावा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2023 04:10 PM2023-11-02T16:10:32+5:302023-11-02T16:15:43+5:30

हल्ला करणारे पूर्ण तयारीत होते, त्यांच्या बॅगेत दगड, पेट्रोल बॉम्ब होते. त्यांचा हेतु मला जीवे मारण्याचा होता.

Among the attackers were those doing illegal business, including political opponents; Sensational claim of MLA Prakash Solanke | हल्लेखोरांमध्ये राजकीय विरोधकांसह अवैध धंदे करणारे; आमदार सोळंके यांचा खळबळजनक दावा

हल्लेखोरांमध्ये राजकीय विरोधकांसह अवैध धंदे करणारे; आमदार सोळंके यांचा खळबळजनक दावा

बीड: माजलगाव येथील घरावर हल्ला करणाऱ्यांमध्ये अवैध धंदे करणाऱ्यांसह माझे राजकीय विरोधक देखील होते, तसेच हल्लेखोर पूर्ण तयारीनिशी आले होते, त्यांचा उद्देश  माझ्या जीवितास बरेवाईट  करण्याचा होता, असा खळबळजनक दावा आमदार प्रकाश सोळंके यांनी केला. सोमवारी घरावर हल्ला झाल्यानंतर आज आमदार सोळंके यांनी पत्रकार परिषदेत आपबीती कथन केली.तसेच या प्रकरणात सरसकट धरपकड न करता केवळ समाजकंटकांनांच अटक करावी अशी मागणी आमदार सोळंके यांनी केली.

सोमवारी आमदार प्रकाश सोळंके यांच्या बंगल्यात घुसून जमावाने आग लावली. त्यानंतर जमाव सुंदरराव सोळंके महाविद्यालयाकडे गेला. तेथे जाळपोळ केल्यानंतर नागरी पतसंस्थेच्या कार्यालयाला आग लावली. त्यानंतर शहरातील नगरपालिका आणि पंचायत समितीची इमारत पेटवून दिली. या घटनेनंतर सीसीटीव्ही तपासून पोलिसांनी ४० पेक्षा जास्त आरोपी शोधले आहेत. यांपैकी २१ जणांना ताब्यात घेत अटक करण्यात आली आहे. याप्रकरणी आज आमदार सोळंके यांनी पत्रकार परिषदेत माहिती दिली. जीवघेण्या हल्ल्याची आपबीती कथन करताना आमदार सोळंके म्हणाले, जमाव माझ्या घराकडे येणार याची माहिती देण्यात आली होती.जमावास भेटून संवाद साधण्याची मी तयारी केली होती. सात ते आठ पोलिस बंदोबस्तावर होते. मात्र, माझ्या घरावर, कार्यालयावर तीनशे फुट दुरवरूनच जोरदार दगडफेक सुरू झाली. जमावाने तीन चारचाकी, आठ ते दहा दुचाकी, कार्यालयातील साहित्य जाळून टाकले. सीसीटीव्ही फुटेज पाहिले असता या जमावात दोनशे ते तीनशे समाजकंटक होते. यात माझे मागील ३५ वर्षांच्या कारकिर्दीतील राजकीय विरोधक, अवैध धंदे करणारे होते, असा दावा आमदार सोळंके यांनी यावेळी केला. 

फक्त समाजकंटकांना ताब्यात घ्यावे
हल्ला करणारे पूर्ण तयारीत होते, त्यांच्या बॅगेत दगड, पेट्रोल बॉम्ब होते. त्यांचा हेतु मला जीवे मारण्याचा होता. याप्रकरणी २१ जणांना ताब्यात घेण्यात आले असून यातील ८ जण इतर समाजाचे आहेत.  माझ्या जीव वाचविणारे देखील मराठा समाजाचे होते. पोलिसांना सीसीटीव्ही फुटेज दिले असून केवळ हल्ला करणाऱ्या समाजकंटकांवर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी देखील आमदार सोळंके यांनी यावेळी केली. 

आरक्षणावर सरकारने मनोज जरांगे यांच्याशी चर्चा करावी
मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस, उपमुख्यमंत्री पवार हे तिन्ही नेते मराठा आरक्षणसाठी बांधील आहेत. सरकार आणखी वेळ मागत आहेत. दरम्यान, उपोषणामुळे मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे.याबाबत सर्वांना चिंता आहे. यामुळे सरकारने कशा प्रकारे, किती वेळात आरक्षण देणार हे जाहीर करावे, जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करून कमीतकमी वेळात सरकारने हा प्रश्न सोडवावा अशी मागणी देखील आमदार सोळंके यांनी केली.

जाळपोळ प्रकरणात पोलिसांनी दिली फिर्याद 
दरम्यान, सोमवारी घडलेल्या विविध ५ गुन्ह्यांपैकी पोलिस उपनिरीक्षक केरबा बाबूराव माकणे यांनी शहर पाेलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. राजेंद्र होके, रामचंद्र डोईजड यांनी सोशल मीडियावर चेतावणीखोर मेसेज व्हायरल करून सोमवारी सकाळी १० वाजता एकत्र येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार सोमवारी जमावाने आमदार प्रकाश सोळंके यांची प्रतीकात्मक अंत्ययात्रा विनापरवाना काढली. त्यानंतर जमाव सोळंके यांच्या बंगल्यावर पोहोचला. दादाला भेटायचे असे कारण सांगत घरात प्रवेश केला आणि दगडफेक सुरू केली. यावेळी जमावाने लाठी, काठी, दगड, पेट्रोल बॉम्ब आणि विविध हत्यारांचा वापर केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. सोमवारच्या घटनेप्रकरणी पोलिसांनी काही जणांना ताब्यात घेतले. दिलीप उद्धव आगे (तालखेड), वैभव भार उगले (चिंचगव्हाण), शिवाजी उर्फ गोविंद चिरके, आकाश दत्तात्रय शिंदे, योगेश तुकाराम राऊत (शिवाजीनगर), कृष्णा शिवाजी पाबळे (जिजामातानगर), अजय अनिल भुलंगे (पाथरूड), अशोक वसंत मंदे, कृष्णा तुकाराम निरडे (पाॅवरहाऊस रोड), नागेश हनुमान पांढरपोटे, प्रशांत पांडुरंग पांढरपोटे (मोगरा) यांचा ताब्यात घेतलेल्या आरोपींमध्ये समावेश आहे.

Web Title: Among the attackers were those doing illegal business, including political opponents; Sensational claim of MLA Prakash Solanke

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.