'ट्रॅप फेल'चा आरोप; अधिकाऱ्यांवरच अविश्वास निर्माण झाल्यास बीड 'एसीबी'वर कसा राहणार विश्वास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 11, 2025 16:54 IST2025-11-11T16:53:43+5:302025-11-11T16:54:33+5:30
२०२४ च्या तुलनेत कारवाया घटल्या, यापूर्वीही एसीबीवर झाले होते आरोप

'ट्रॅप फेल'चा आरोप; अधिकाऱ्यांवरच अविश्वास निर्माण झाल्यास बीड 'एसीबी'वर कसा राहणार विश्वास?
बीड : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागातील एका पोलीस निरीक्षकाने संगनमत करून 'ट्रॅप' फेल केल्याचा गंभीर आरोप करत थेट छत्रपती संभाजीनगर येथील एसीबीच्या पोलीस अधीक्षकांकडे तक्रार करण्यात आल्याने पोलीस दलात मोठी खळबळ उडाली होती. जर लाचखोरीच्या कारवाया करणाऱ्या अधिकाऱ्यांवरच असे गंभीर आरोप होत असतील, तर एसीबीवर सामान्यांचा विश्वास कसा बसेल आणि तक्रारदार पुढे कसे येतील, असा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
गेवराई तालुक्यातील एका शेतकऱ्याने गायगोठ्याच्या वर्कऑर्डरसाठी पंचायत समितीतील अधिकाऱ्याकडे लाच मागितल्याची तक्रार घेऊन १ ऑक्टोबर २०२५ रोजी बीड एसीबीचे पोलीस उपअधीक्षक आणि नंतर पोलीस निरीक्षक कवडे यांना भेट घेतली. निरीक्षकांनी दुसऱ्या दिवशी ५ ते ५:३० वाजेदरम्यान बोलावले आणि 'पंच नाहीत, दोन दिवसांनी या' असे सांगून वेळ मारून नेली. वास्तविक पाहता, उपअधीक्षकांना भेटल्याचे सांगितल्यावरही निरीक्षकांनी उशिरा आल्याचे कारण दिले. विशेष म्हणजे, ट्रॅप फेल झाल्यानंतर त्याच दिवशी (२ ऑक्टोबर २०२५) गेवराईच्या गटविकास अधिकाऱ्यांनी संबंधित शेतकऱ्याला व्हॉट्सॲपवर 'तुमची फाईल ओके झाली' असा मेसेज केला. लाचेची मागणी असताना फाईलला अचानक गती आल्याने, पोलीस निरीक्षकांवर आरोप करत तक्रार केली.
एसीबीचे बीड युनिट अडचणीत
हा नवा प्रकार समोर आल्याने बीड एसीबीचे युनिट अडचणीत आले आहे. यापूर्वीही बीडच्या एसीबीवर 'हप्ते' घेत असल्याचा आरोप झाला होता, तसेच एका अधिकाऱ्यावर गुन्हाही दाखल झाला होता. याशिवाय, एसीबीच्या कारवायांमध्येही मोठी घट झाली आहे. उपलब्ध माहितीनुसार, २०२४ च्या तुलनेत २०२५ मध्ये आतापर्यंत कारवायांची संख्या तीन ने कमी आहे. अशा परिस्थितीत, 'ट्रॅप फेल' झाल्याच्या आरोपांमुळे सामान्य नागरिकांचा एसीबीवरील विश्वास डगमगण्याची भीती व्यक्त होत आहे. या प्रकरणाची सखोल आणि निष्पक्ष चौकशी होणे आवश्यक आहे.
उपअधीक्षकांची झाली होती बदली
यापूर्वी हप्तेखोरीच्या आरोपांमुळे उपअधीक्षकांची बदली झाली होती. तसेच एका अधिकाऱ्यावर पैसे मागितल्याच्या आरोपावरून २०२१ मध्ये गुन्हाही दाखल झाला होता. एक आरोपी याच कार्यालयातून पळूनही गेला होता. त्यात आणखी एका प्रकरणाची भर पडली आहे. बीडचे युनिट वादात सापडल्याने चौकशीची मागणी होत आहे.