परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीनही संच बंद; वीज निर्मिती शून्यावर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2025 14:21 IST2025-07-04T14:19:53+5:302025-07-04T14:21:01+5:30
राज्यात पावसामुळे वीज मागणी कमी झाल्याने परळीतील तीनही संच बंद ठेवण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले.

परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीनही संच बंद; वीज निर्मिती शून्यावर!
- संजय खाकरे
परळी (जि. बीड) : मराठवाड्याच्या हृदयस्थानी असलेल्या परळी औष्णिक विद्युत केंद्रातील तीनही संच बंद ठेवण्यात आल्याने वीज निर्मिती पूर्णतः ठप्प झाली आहे. नवीन परळी औष्णिक विद्युत केंद्रातील एकूण ७५० मेगावॅट क्षमतेपैकी सध्या शून्य वीज निर्मिती होत असल्याची धक्कादायक माहिती गुरुवारी समोर आली आहे.
राज्यात पावसामुळे वीज मागणी कमी झाल्याने परळीतील तीनही संच बंद ठेवण्यात आल्याचे अधिकृत सूत्रांनी स्पष्ट केले. विशेष म्हणजे, संपूर्ण मराठवाड्यातील हे एकमेव औष्णिक विद्युत केंद्र आहे, जे येथे धडधडत होते. परळी तालुक्यातील दादाहारी वडगाव व दाऊतपूर शिवारातील नवीन औष्णिक केंद्रातील २५० मेगावॅट क्षमतेचे तीन संच आहेत. यातील संच क्रमांक सहा व सात हे दोन संच मागील १५ दिवसांपासून बंद आहेत, तर संच क्रमांक आठ तब्बल महिनाभरापासून बंद आहे. यामुळे परळीतील औष्णिक विद्युत केंद्राची वीज निर्मिती सध्या संपूर्ण थांबली आहे. विद्युत संच बंद ठेवण्यात आल्याने, कोळशाचा पुरवठादेखील कमी प्रमाणात होत असल्याने ही स्थिती अधिक बिकट झाली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या आदेशानंतरच बंद ठेवलेले संच पुन्हा सुरू करण्यात येणार असल्याची माहिती औष्णिक केंद्राचे मुख्य अभियंता सुनील इंगळे यांनी दिली.
८०० अधिकारी, कर्मचारी
राज्यात विजेची मागणी वाढल्यानंतर हे संच कार्यरत होतील. दरम्यान, या नवीन औष्णिक केंद्रात सुमारे ८०० अधिकारी व कर्मचाऱ्यांचा कर्मचारी वर्ग कार्यरत आहे. मात्र, तीनही संच बंद असल्याने कर्मचाऱ्यांमध्ये हे संच कधी सुरू होतील, याकडे लक्ष लागले आहे.