अजितदादांची अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्यासाठी बीडच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवारांची नियुक्ती
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2026 16:25 IST2026-02-03T16:18:56+5:302026-02-03T16:25:14+5:30
बीडच्या हक्काचा 'पालक' बदलला! सुनेत्रा पवार सांभाळणार जिल्ह्याचा विकास आणि कायदा-सुव्यवस्था.

अजितदादांची अपूर्ण स्वप्नं पूर्ण करण्यासाठी बीडच्या पालकमंत्रीपदी सुनेत्रा पवारांची नियुक्ती
बीड: राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे निर्माण झालेली राजकीय आणि प्रशासकीय पोकळी भरून काढण्यासाठी राज्य सरकारने मोठे पाऊल उचलले आहे. अजितदादांच्या रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्री पदावर आता सुनेत्रा पवार यांची वर्णी लागली असून, त्यांच्याकडे पुणे आणि बीड या दोन अत्यंत महत्त्वाच्या जिल्ह्यांच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) आमदारांच्या आग्रहाचा मान राखत या नियुक्तीवर शिक्कामोर्तब केले आहे.
बीड जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून अजितदादांनी अल्पावधीतच प्रशासकीय शिस्त आणि विकासाचा धडाका लावला होता. संतोष देशमुख हत्याप्रकरणात धनंजय मुंडे यांचा राजीनामा झाल्यानंतर अजितदादांनी जिल्ह्याची धुरा स्वतःकडे घेतली होती. त्यांनी सुरू केलेले प्रकल्प पूर्ण करण्यासाठी सुनेत्रा पवार याच योग्य असल्याचे मत आमदारांनी व्यक्त केले. त्यामुळे पुणे या बालेकिल्ल्यासोबतच बीडच्या विकासाची जबाबदारीही आता वहिनींकडे आली आहे.
राष्ट्रवादीचे नेतृत्व आणि प्रशासकीय पकड
केवळ सरकारमध्येच नाही, तर पक्षातही सुनेत्रा पवार यांची पकड मजबूत झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ पक्षनेतेपदी त्यांची एकमताने निवड झाली असून, प्रफुल पटेल यांनी दिलेल्या माहितीनुसार, पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची धुराही त्यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. अर्थ खाते वगळता अजितदादांकडे असलेली इतर सर्व महत्त्वाची खाती आता सुनेत्रा पवार सांभाळणार आहेत.
९ फेब्रुवारीला मंत्रालयातून कामकाजाची सुरुवात
अजितदादांचा कार्यशैलीचा वारसा पुढे नेत, सुनेत्रा पवार येत्या ९ फेब्रुवारी रोजी मंत्रालयातील आपल्या कार्यालयातून प्रत्यक्ष कामकाजाला सुरुवात करणार आहेत. दादांप्रमाणेच त्या कार्यकर्त्यांशी थेट संवाद साधून लोकांचे प्रश्न मार्गी लावतील, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे. अजितदादांच्या निधनानंतर बारामती आणि बीडमध्ये पाळण्यात आलेल्या बंदने त्यांच्याबद्दलची आत्मीयता सिद्ध केली होती; आता त्याच नात्याला सुनेत्रा पवार न्याय देतात का, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.