"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 13, 2025 17:25 IST2025-11-13T17:20:30+5:302025-11-13T17:25:01+5:30
Manoj Jarange Patil Ajit Pawar Dhananjay Munde: मनोज जरांगे पाटील आणि धनंजय मुंडे यांच्यात हत्येच्या कटाचे प्रकरण समोर आल्यानंतर आरोप प्रत्यारोप सुरू झाले आहे. धनंजय मुंडेंवरून जरांगेंनी आता अजित पवारांनाही इशारा दिला आहे.

"अजित पवारांनी सांभाळून राहावं, त्यांना बळ देऊ नये"; मनोज जरांगे भडकले, धनंजय मुंडेंबद्दल काय बोलले?
Manoj Jarange Patil Dhananjay Munde: "मला जीवे मारण्याचा कट रचला. नार्को चाचणी करण्याची मागणी केली. धनंजय मुंडे माझ्या घातपात करण्यापर्यंत गेले. आता सुट्टी नाही. आता लपायचे नाही. दोघेही सोबत जाऊ", अशी भूमिका मांडत मनोज जरांगे पाटील उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही भडकले. 'त्याला पाठवा नाही तर 2029 ला तुमची फजिती होईल', असा इशारा जरांगे पाटलांनी अजित पवारांना दिला.
मनोज जरांगे पाटलांचा हत्येचा कट रचल्याच्या प्रकरणाचा पोलीस तपास सुरू आहे. यात काही जणांना अटक झाली असून, धनंजय मुंडे यांच्या जवळचे कांचन साळवी यालाही पोलिसांनी अटक केली. या प्रकरणावरून धनंजय मुंडे आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात आरोप-प्रत्यारोपांचे युद्ध सुरू आहे. त्यातच धनंजय मुंडे यांना स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्टार प्रचारकांच्या यादीत स्थान देण्यात आले आहे.
जरांगे अजित पवारांना काय म्हणाले?
धनंजय मुंडे यांना पक्षाकडून स्टार प्रचारक करण्यात आले आहे. त्याबद्दल जेव्हा मनोज जरांगे पाटील यांना विचारण्यात आले, तेव्हा ते म्हणाले, "धनंजय मुंडेला डोनाल्ड ट्रम्प यांच्यासोबत पाठवलं तरी माझी हरकत नाही. त्याला आधी तपासणीसाठी पाठवावे. अजितदादा, तुमच्या मुलाचा घातपात केला असता, तर तुम्ही गप्प बसले असते का? पांघरुण का घालता. २०१९ ला याचा पश्चाताप होईल. त्याला पाठवा नाही तर २०२९ ला तुमची फजिती होईल", असा इशारा मनोज जरांगे पाटलांनी अजित पवारांना दिला.
"अजित पवार, तु्म्हाला एक सांगतो त्याला चौकशीसाठी लवकर पाठवा. मला जीवे मारण्याचा कट रचला. नार्को टेस्टची मागणी मी केली नव्हती. धनंजय मुंडे माझ्या घातपातापर्यंत पोहोचले. आता लपायचं नाही. दोघेही सोबत जाऊ. नार्को टेस्ट करायचीच, आता सगळंच बाहेर येऊ द्या", असे जरांगे म्हणाले आहेत.
"अजित पवारांनी सांभाळून राहावं -मनोज जरांगे
"कांचन नावाचा त्यांचा माणूस, ज्याने या दोघांना घरातून परळीला नेले. ते परळीला गेले म्हणजे परळीत खुनाचा कट शिजला होता. धनंजय मुंडे आणि त्याच्या साथीदाराने मिळून हा कट रचला, सत्य उघड होणार आहे. अजित दादांनी सांभाळून राहावं. त्यांना बळ देऊ नये. प्रत्येकवेळी त्याला वाचवायचं नाही. हे मोठं षडयंत्र आहे. धनंजय मुंडेंनी या टोकापर्यंत जायला नको होतं", असेही मनोज जरांगे म्हणाले.