गोपीनाथ मुंडेंपासून अजितदादांपर्यंत; दिग्गजांच्या 'अखेरच्या क्षणांचे' विधिकर्ता शास्त्री गुरुजी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 30, 2026 13:40 IST2026-01-30T13:37:04+5:302026-01-30T13:40:13+5:30
Ajit Pawar Death: दगडूशेठ मंदिरातली पूजा ते अनेक राजकीय घराण्यांचे 'गुरुजी'

गोपीनाथ मुंडेंपासून अजितदादांपर्यंत; दिग्गजांच्या 'अखेरच्या क्षणांचे' विधिकर्ता शास्त्री गुरुजी कोण?
- पुरुषोत्तम करवा
माजलगाव : माजलगावच्या मातीतील एक तरुण, जो घरच्या गरिबीमुळे आणि हलाखीच्या परिस्थितीमुळे एकेकाळी घर सोडून पळाला होता, तो आज देशातील बड्या राजकीय घराण्यांचा ‘श्रद्धास्थान’ बनला आहे. गजानन शास्त्री गुंजकर असे या व्यक्तिमत्त्वाचे नाव. गुरुवारी महाराष्ट्राचे लाडके नेते अजित पवार यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्काराचे विधी पार पडले आणि हे विधी पूर्ण करण्याची जबाबदारी गजानन शास्त्रींनीच निभावली.
गजानन शास्त्रींची पुण्याला जाऊन वेद-विद्येचे शिक्षण घेण्याची त्यांची ओढ होती; पण घरची परिस्थिती बेताची असल्याने कुटुंबाचा विरोध होता. अखेर एका जिद्दीपोटी ते घर सोडून पुण्याला गेले. तिथे सुरुवातीची तीन वर्षे दगडूशेठ गणपती मंदिरात त्यांनी मनोभावे पूजा-अर्चा केली. याच काळात त्यांची भेट धनंजय मुंडे यांच्याशी झाली. मुंडेंनी अनेक नेत्यांशी त्यांची ओळख करून दिली. माजलगावच्या एका सामान्य कुटुंबातून निघालेला हा प्रवास आज राज्याच्या आणि देशाच्या इतिहासातील अनेक महत्त्वाच्या क्षणांचा साक्षीदार बनला आहे.
पवार घराण्याचे ‘फॅमिली गुरुजी’
गेल्या आठ वर्षांपासून अजित पवार यांच्याशी गजानन शास्त्रींचा कौटुंबिक जिव्हाळा निर्माण झाला होता. पवारांच्या घरातील प्रत्येक देवकार्य, शुभमंगल कार्य हे शास्त्रींच्या उपस्थितीशिवाय पूर्ण होत नसे. ते केवळ गुरुजीच राहिले नाहीत, तर पवार घराण्याचे ‘फॅमिली गुरुजी’ बनले. अगदी दोन महिन्यांपूर्वी अजितदादांचे पुत्र जय पवार यांचा विवाह सोहळा बहरीनसारख्या देशात पार पडला, तिथेही सर्व विधी गजानन शास्त्रींनीच पूर्ण केले होते.
दिग्गजांचा अखेरचा निरोप
शास्त्री यांनी यापूर्वी देशाचे माजी अर्थमंत्री अरुण जेटली, लोकनेते गोपीनाथराव मुंडे, गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे आणि अनाथांची माय सिंधुताई सपकाळ यांच्यावर शास्त्रोक्त पद्धतीने अंत्यसंस्काराचे विधी पार पाडले आहेत.
संपूर्ण महाराष्ट्र पोरका
अजितदादा हे स्पष्टवक्ते, शब्दाला जागणारे आणि हजरजबाबी नेते होते. त्यांचे कुटुंब अतिशय सुसंस्कृत आहे. त्यांच्या जाण्याने केवळ वैयक्तिक नुकसान झाले नाही, तर संपूर्ण महाराष्ट्र पोरका झाला आहे.
- गजानन शास्त्री गुंजकर