बीडचे 'पालक' हरपले! अजित पवारांच्या निधनाने विकासाचा झंझावात शांत; २२ कोटींच्या निधीची ती शेवटची भेट ठरली
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2026 11:45 IST2026-01-28T11:44:23+5:302026-01-28T11:45:49+5:30
Ajit Pawar Death: प्रशासकीय शिस्तीचा 'दादा पॅटर्न' संपला! बीडच्या प्रगतीसाठी झटणारा एक कार्यसम्राट नेता हरपला

बीडचे 'पालक' हरपले! अजित पवारांच्या निधनाने विकासाचा झंझावात शांत; २२ कोटींच्या निधीची ती शेवटची भेट ठरली
बीड: बीड जिल्ह्याच्या विकासाला गती देणारे, प्रशासकीय कामात शिस्त आणणारे आणि जिल्ह्याचे लाडके पालकमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनाची वार्ता धडकताच संपूर्ण जिल्हा सुन्न झाला आहे. बुधवारी सकाळी झालेल्या दुर्दैवी विमान अपघातात 'दादां'चा अंत झाला आणि बीडच्या प्रगतीचा एक महत्त्वाचा अध्याय अपूर्ण राहिला.
शेवटच्या श्वासापर्यंत जिल्ह्याचा ध्यास
अजितदादांनी बीडचे पालकत्व स्वीकारल्यापासून जिल्ह्यासाठी निधीचा ओघ कधीच कमी पडू दिला नाही. अवघ्या दोन दिवसांपूर्वीच त्यांनी बीड शहरातील २४ विविध विकासकामांसाठी २२ कोटी रुपयांचा निधी मंजूर केला होता. तो निधी जणू त्यांनी बीडकरांना दिलेली शेवटची भेट ठरली. अहिल्यानगर ते परळी या प्रलंबित रेल्वे मार्गासाठी त्यांनी दिलेले योगदान आणि बीडला विमानतळ मिळवून देण्यासाठीचा त्यांचा पाठपुरावा जिल्ह्याच्या इतिहासात मैलाचा दगड मानला जातो.
बीडकरांशी होते भावनिक नाते
केवळ रस्ते आणि इमारतीच नव्हे, तर 'ट्रिपलआयटी' सारख्या प्रकल्पातून बीडच्या तरुणांना रोजगार मिळावा, हा त्यांचा ध्यास होता. जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून ५७५ कोटी रुपयांची विक्रमी तरतूद करून त्यांनी जिल्ह्याच्या शेवटच्या घटकापर्यंत विकास पोहोचवला. त्यांच्या कामाच्या झपाट्यामुळे प्रशासकीय वर्तुळात 'दादा पॅटर्न'ची मोठी दहशत आणि आदर होता. आज त्यांच्या जाण्याने केवळ एक राजकारणी नाही, तर बीडच्या प्रगतीचा खरा शिल्पकार हरपला आहे. जिल्ह्यातील व्यापारी, शेतकरी आणि सामान्य नागरिकांनी आपापल्या परीने त्यांना श्रद्धांजली अर्पण केली असून संपूर्ण जिल्ह्यात शोककळा पसरली आहे.