परळी: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्या विमान अपघातातील निधनाची वार्ता धडकताच परळी शहरासह ग्रामीण भागात भीषण शांतता पसरली आहे. गेल्या १५ वर्षांपासून परळीच्या विकासात आणि राजकारणात अविभाज्य घटक राहिलेल्या अजितदादांच्या जाण्याने परळी पोरकी झाल्याची भावना व्यक्त होत आहे.
बाजारपेठा आणि शाळा बंद; शहर झाले शोकाकुल दादांच्या निधनाचे वृत्त समजताच परळीतील व्यापाऱ्यांनी स्वयंस्फूर्तीने दुकाने बंद ठेवली, तर शाळांनाही सुट्टी देण्यात आली. शहरातील राणी लक्ष्मीबाई टॉवर चौकात जमलेल्या सर्वपक्षीय पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत पाणी होते. भाजप, राष्ट्रवादी आणि इतर सर्वच पक्षांच्या नेत्यांनी मतभेद बाजूला सारून आपल्या या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.
भेटीची संधी कायमची हुकली माजी नगराध्यक्ष बाजीराव धर्माधिकारी यांनी अत्यंत जड अंतःकरणाने जुन्या आठवणींना उजाळा दिला. "आम्ही आणि आमदार धनंजय मुंडे साहेब लवकरच विकासकामांच्या शुभारंभासाठी दादांची वेळ घेणार होतो. नवनिर्वाचित पदाधिकारी त्यांच्या भेटीसाठी बारामतीला जाणार होते; मात्र नियतीने ती संधीच हिरावून घेतली," अशी खंत त्यांनी व्यक्त केली. सलग तीन टर्म नगरपालिकेच्या माध्यमातून झालेल्या विकासकामांच्या पाठीशी दादांचा हिमालयीन आधार होता, अशी भावना त्यांनी व्यक्त केली.
अजितदादा, असे अचानक निघून जाणे बरोबर नाही..!
'असा नेता पुन्हा होणे नाही' परळीच्या नवनिर्वाचित नगराध्यक्षा पद्मश्री धर्माधिकारी यांनीही आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. "महाराष्ट्राच्या राजकारणातील खरे 'दादा' आज गेले आहेत. त्यांच्या जाण्याने एका मोठ्या युगाचा अंत झाला असून ही पोकळी कधीही भरून निघणार नाही," अशा शब्दांत त्यांनी आदरांजली वाहिली. यावेळी ॲड. अरुण पाठक, वैजनाथ कळसकर, आयुब पठाण यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी आपल्या नेत्याच्या आठवणींना उजाळा दिला.
Web Summary : Parli plunged into grief as news of Ajit Pawar's death spread. Businesses and schools shut down, and locals gathered to pay respects. Leaders across parties mourned the loss of a leader instrumental in Parli's development, remembering his support for various projects.
Web Summary : अजित पवार के निधन की खबर फैलते ही परली शोक में डूब गया। दुकानें और स्कूल बंद हो गए, और स्थानीय लोग श्रद्धांजलि देने के लिए एकत्र हुए। विभिन्न दलों के नेताओं ने परली के विकास में महत्वपूर्ण भूमिका निभाने वाले नेता के नुकसान पर शोक व्यक्त किया और विभिन्न परियोजनाओं के लिए उनके समर्थन को याद किया।