पुन्हा बहिणभाऊ आमनेसामने; वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी पंकजा मुंडेंनी भरला अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2023 20:01 IST2023-05-15T20:00:13+5:302023-05-15T20:01:25+5:30
पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या 21 जागेसाठी 11 जून रोजी मतदान होणार आहे.

पुन्हा बहिणभाऊ आमनेसामने; वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्यासाठी पंकजा मुंडेंनी भरला अर्ज
- संजय खाकरे
परळी: तालुक्यातील पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीसाठी भाजपच्या राष्ट्रीय सचिव व वैद्यनाथ सहकारी कारखान्याच्या माजी चेअरमन पंकजा गोपीनाथराव मुंडे, वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी व्हाइस चेअरमन फुलचंद कराड, माजी संचालक शिवाजी गुट्टे, श्रीहरी मुंडे यांच्यासह 15 जणांनी आपले नाम निर्देशनपत्र आज दाखल केले आहेत.
पांगरी येथील वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या 21 जागेसाठी 11 जून रोजी मतदान होणार आहे. त्यासाठी दि 10 ते 16 मे दरम्यान निवडणूक निर्णय अधिकारी, सहाय्यक निबंधक कार्यालय परळी यांच्या कार्यालयात नामनिर्देशन पत्र दाखल करावयाचे आहे. आज संचालकपदाच्या जागेसाठी 15 जणांनी आपले नामनिर्देशन पत्र दाखल केले आहे तर 16 मे रोजी नामनिर्देशन पत्र दाखल करण्याची शेवटची तारीख असल्याने मंगळवारी नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी इच्छुक उमेदवारांची गर्दी होणार आहे.
आज यांनी केले अर्ज दाखल
पंकजा गोपीनाथराव मुंडे, फुलचंद कराड , सूर्यकांत रामकृष्ण मुंडे, बाबासाहेब शंकरराव शिंदे ,रामकिशन घाडगे ,गोदाबाई गीते ,विनायक गडदे ,राजेश गीते ,शिवाजी गुट्टे, सतीश मुंडे, श्रीहरी मुंडे या 11 जणांनी एकूण 15 उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. पंकजा मुंडे यांनी महिला राखीव प्रतिनिधी व व्यक्ती उत्पादक सभासदांनी निवडून द्यायचा प्रतिनिधी नाथरा या गटात उमेदवारी अर्ज दाखल केला आहे तर फुलचंद कराड यांनी व्यक्ति उत्पादक सभासदांनी निवडून द्यावयाचा गटातून व अन्य एका गटातून अर्ज दाखल केला आहे तसेच राजेश गीते व सतीश मुंडे यांनी दोन गटात अर्ज भरले आहेत.
पुन्हा मुंडे भाऊ- बहिण आमनेसामने
वैद्यनाथ साखर कारखान्याच्या संचालकपदाच्या निवडणुकीची तयारी भाजपाच्या राष्ट्रीय सचिव व वैद्यनाथ कारखान्याच्या चेअरमन पंकजा मुंडे तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार धनंजय मुंडे यांनी सुरू केली आहे. दोघांनी पॅनल उभे करण्याच्या दृष्टीने व्युव्हरचना आखली आहे. वैद्यनाथ सहकारी साखर कारखान्याचे माजी उपाध्यक्ष महानंदचे संचालक फुलचंद कराड हे ही कारखाना निवडणुक लढविण्यासाठी सज्ज झाले आहेत.