ब्लॅंक चेकवरून मुंडे बहिणभावात जुगलबंदी, पंकजाच्या ब्लॅंक चेकवर धनंजय म्हणाले...
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 16, 2022 19:30 IST2022-11-16T19:27:28+5:302022-11-16T19:30:50+5:30
श्रद्धा गायकवाड या कन्येनं अहमदाबाद येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत "स्केट बोर्ड" या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात आले एकत्र.

ब्लॅंक चेकवरून मुंडे बहिणभावात जुगलबंदी, पंकजाच्या ब्लॅंक चेकवर धनंजय म्हणाले...
परळी (बीड) : मुंडे बहिण भावांचे राज्यातील राजकारणात वेगळे स्थान आहे. पंकजा मुंडे माजी मंत्री तथा भाजपच्या राष्ट्रीय सचिव म्हणून सध्या कार्यरत आहेत. तर माजी मंत्री धनंजय मुंडे हे राष्ट्रवादीचे आघाडीचे नेते आहेत. परळी विधानसभेच्या जागेवरून दोघांमधील द्वंद्व सर्वश्रुत आहे, त्यामुळे कोणत्याही कारणांनी दोघे बहिणभाऊ एकाच व्यासपीठावर आले की उपस्थितांना एकप्रकारे पर्वणीच असते. सोमवारी रात्री देखील असाच प्रसंग आला आणि मुंडे भाऊबहिणीमधील संवादाने उपस्थितांची मने जिंकली.
निमित्त होते परळीच्या श्रद्धा रविंद्र गायकवाड हिच्या सत्काराचे. येथील श्रद्धा गायकवाड या कन्येनं अहमदाबाद येथे झालेल्या ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत "स्केट बोर्ड" या क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविले. परळीकरांसाठी हा ऐतिहासिक सुवर्णक्षण आहे. हा आनंदोत्सव साजरा करण्यासाठी परळीत सोमवारी ( दि.१४) येथील लोकनेते गोपीनाथराव मुंडे नटराज रंगमंदिरमध्ये सुवर्णकन्या श्रद्धाचा भव्य नागरी गौरव सोहळा समितीच्यावतीने आयोजित करण्यात आला आहे. विषेध म्हणजे, हा गौरव माजी मंत्री आ. धनंजय मुंडे, माजी मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते पार पडला. अनेक दिवसांनी एकाच व्यासपीठावर मुंडे बहिणभाऊ आल्याने कार्यक्रमात उपस्थित मान्यवरांसह सर्वांचे लक्ष होते ते बहिणभावांच्या भाषणाकडे. झालेही तसेच, माजी मंत्री पंकजा मुंडे यांचे भाषण सुरुवातीला झाले. श्रद्धा गायकवाडचे कौतुक करत पंकजा यांनी पुढील वाटचालीसाठी सर्वकाही मदत करण्याची ग्वाही दिली. तसेच तू कधीही ये गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानतर्फे तुझ्या नावाचा एक ब्लॅंक चेक तयार ठेवते, तो बाऊन्स होणार नाही. माझी लेक समजून तुला तो देईल, असा शब्द दिला.
यानंतर माजी मंत्री धनंजय मुंडे हे भाषणास उभे राहिले. यावेळी धनंजय यांनी श्रद्धाने मिळवलेल्या यशाबद्दल अभिनंदन केले. तिच्या आईने दागिने विकून तयारीसाठी पैसा उभारला. आता माझ्या बहिणीने तिच्यासाठी ब्लॅंक चेक तयार ठेवला आहे. मी आणखी काय करू, असे धनंजय म्हणाले. ऐवढ्यात पंकजा यांनी, तू खात्यात पैसे टाक अशी कोपरखळी मारली. यावर काही काळ धनंजय बहिण पंकजाकडे पाहत राहिले. हे दृश्य पाहून सभागृहात एकच हास्य पसरले. धनंजय पुन्हा म्हणाले, बहिणीने जरी ब्लॅंक चेक दिला असला तरी भाऊ तो बाउन्स होऊ देणार नाही. दोघांचा खेळीमेळीचा संवाद या कार्यक्रमाच्या निमित्ताने परळीकरांनी अनेक वर्षांनी अनुभूवला.
परळीचे नाव भारतातच नव्हे तर जगभर गाजवेल
पुण्यात स्पोर्ट मॉलच्या दुकानात माझे वडील सुरक्षा रक्षक आहेत. येथेच स्केट बोर्ड पाहिले आणि शिकले. आधी पुण्यात मी एकटीच गर्ल्स स्केटर होते. आता मुलींचा ओढा याकडे वाढला आहे. आईचे दागिने विकून मला राष्ट्रीय स्पर्धेसाठी वडिलांनी पाठविले. आईवडिलांच्या पाठबळामुळे हे यश प्राप्त करता आले. परळीकरांनी खूप प्रेम दिले. परळीचे नाव भारतातच नव्हे तर जगभर गाजवेलं, अशी ग्वाही ३६ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत "स्केट बोर्ड" क्रीडा प्रकारात सुवर्णपदक पटकाविलेल्या श्रद्धा गायकवाड ने दिली.