परळीत पोस्टऑफिसमधून 'आधार'चे साहित्य लंपास; कुलूप न तुटल्याने ट्रेझरीतील रक्कम वाचली
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2025 16:50 IST2025-03-10T16:49:36+5:302025-03-10T16:50:10+5:30
पोस्ट कार्यालयात सीसीटीव्ही व रात्रपाळी सुरक्षा कर्मचारी नाही अशी माहिती प्राप्त झाली आहे.

परळीत पोस्टऑफिसमधून 'आधार'चे साहित्य लंपास; कुलूप न तुटल्याने ट्रेझरीतील रक्कम वाचली
- संजय खाकरे
परळी ( बीड ) : शहरातील वर्दळीच्या ठिकाणी असलेल्या राणी लक्ष्मीबाई टावर जवळी पोस्ट ऑफिसच चोरट्यांनी फोडण्याचा प्रकार शनिवारी रात्री नंतर घडला आहे. अज्ञात चोरट्यनी पोस्ट ऑफिस मधील आधार सेंटरचे सर्वच साहित्य चोरून नेले आहे. तसेच ट्रेझरी रूमचेही कुलूप तोडून ट्रेझरी फोडण्याचा प्रयत्न झाला आहे. या चोरी प्रकरणी परळीच्या संभाजीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी दुपारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोस्ट कार्यालयात सीसीटीव्ही व रात्रपाळी सुरक्षा कर्मचारी नाही अशी माहिती प्राप्त झाली आहे.
परळीत पहिल्यांदाच पोस्टात चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. परळीचे पोस्ट मास्तर चंद्रकांत हरदास यांनी संभाजीनगर पोलीस ठाण्यात सोमवारी फिर्याद दाखल केली आहे. पोस्ट कार्यालयातील मुख्य दरवाजाचे कुलूपकोंडा तोडून चोरटे आत घुसले. आतील आधार सेंटर मधील संगणक, की बोर्ड ,फिंगरप्रिंट स्कॅनर ,आय स्कॅनर चोरट्यांनी पळून नेले आहे. तसेच शेजारीच असलेल्या ट्रेझरी रूमचेही चोरट्याने कुलूप तोडले. आतील तिजोरीचे कुलप तोडण्याचा प्रयत्न केला. परंतु, ट्रेझरीचे कुलूप काही चोरट्यांना निघू शकले नाही ट्रेझरी मध्ये रोख रक्कम होती परंतु त्याच्या हाती लागू शकली नाही. चोरीस गेलेल्या एकूण साहित्याची किंमत 65 हजार रुपये असल्याची माहिती पोस्टमास्तर चंद्रकांत हरदास यांनी पोलिसांना दिली आहे. चोरीचा हा प्रकार शनिवारी रात्री नंतर घडला. सोमवारी संभाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून घटनास्थळी पोलीस निरीक्षक धनंजय ढोणे व इतर कर्मचाऱ्यांनी भेट दिली आहे. या प्रकरणाचा तपास संभाजी नगरचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आईटवार करीत आहे.
आधार सेंटर चे सर्वच साहित्य चोरीला गेल्याने सोमवारी आधार नाव नोंदणी व दुरुस्तीसाठी आलेल्या नागरिकांची गैरसोय झाली. नाव बदलण्यासाठी संगमहून आलो होतो परंतु काम काही झाले नाही असे संगमचे ग्रामस्थ कुंडलिक दराडे यांनी सांगितले.
बीड येथील वरिष्ठांकडे येथील पोस्टात सीसीटीव्ही बसविण्याचा प्रस्ताव पाठवलेला आहे. परंतु या प्रस्तावाला अद्याप मंजुरी मिळाली नाही.
- चंद्रकांत हरदास, पोस्टमास्तर
परळीच्या पोस्ट कार्यालयात झालेल्या चोरीचा छडा लावण्यात येईल .सीसीटीव्ही फुटेज द्वारे तपास सुरू करण्यात आला आहे.
- धनंजय ढोने, पोलीस निरीक्षक