तरुणाला अमानुष मारहाण प्रकरण; धनंजय देशमुखांचे साडू दादा खिंडकर पोलिसांना शरण
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 11:36 IST2025-03-13T11:34:56+5:302025-03-13T11:36:11+5:30
धनंजय देशमुखांच्या सरपंच साडूकडून तरुणाला मारहाण करण्यात आल्याचा व्हिडीओ व्हायरल; दादा खिंडकरविरोधातही गंभीर गुन्हे दाखल आहेत

तरुणाला अमानुष मारहाण प्रकरण; धनंजय देशमुखांचे साडू दादा खिंडकर पोलिसांना शरण
बीड : मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचे साडू असलेल्या सरपंच दादासाहेब खिंडकर यांचाही एक मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यामध्ये खिंडकरसह पाच ते सहा जणांकडून एका तरुणाचे अपहरण करून बेदम मारहाण केली जात असल्याचे दिसत आहे. हा व्हिडीओ जुना असून, हा वाद मिटल्याचा खुलासा खिंडकर यांनी केला आहे. दरम्यान, खिंडकर यांच्यावरही जीव घेणा हल्यासह इतर गंभीर गुन्हे दाखल आहेत. याप्रकरणाची गंभीर दखल पोलिसांनी घेऊन स्वतःहून गुन्हा दाखल केला. त्यानंतर आज सकाळी दादा खिंडकर पोलिसांना शरण आला. त्याला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित तरुणाचे नाव ओमकार सातपुते असे आहे. त्याने एक व्हिडीओ केला होता. त्याचाच राग मनात धरून दादा खिंडकर आणि त्याच्या साथीदारांनी सातपुते याचे अपहरण करून शेतात नेले. तेथे नेऊन त्याला बेल्ट, वायर, पाइप, काठीने बेदम मारहाण करण्यात आली. यामध्ये एक पोलिस कर्मचारीही असल्याचे सांगण्यात येत आहे. काळा शर्ट घातलेली व्यक्ती सिगारेट ओढत असतानाच त्याला मारहाण करीत आहे. हाच व्हिडीओ आता व्हायरल झाला आहे. खिंडकर हे धनंजय देशमुख यांचे साडू आहेत. त्यामुळे त्यांचीही गुंडगिरी बाहेर आल्याने खळबळ उडाली आहे. धनंजय देशमुख यांनी यावर बोलणे टाळले आहे.
घरात घुसून मारहाण
असाच आणखी एक व्हिडीओ व्हायरल झाला असून, पाच ते सात तरुण हे काठ्या, तलवारीसह इतर हत्यारे घेऊन एका जीपवर मारत आहेत. तसेच दोन ते तीन जण भिंतीवरून पहिल्या मजल्यावर चढले. यामध्येही खिंडकर असल्याचे सांगण्यात येत आहे. परंतु, याला अधिकृत दुजोरा मिळाला नाही.
दादा खिंडकरविरोधात १२ गुन्हे
दादा खिंडकर यांच्याविरोधातही तब्बल १२ गुन्हे दाखल आहेत. यामध्ये पिंपळनेर पाेलिस ठाण्यात ६, बीडमधील शिवाजीनगर ठाणे ४ आणि पेठबीड ठाण्यात २ गुन्हे दाखल आहेत. शासकीय नौकरावर जिवघेणा हल्ला करणे, जीवे मारण्याचा प्रयत्न करणे, रस्त्यात अडवून लुट करणे अशा गुन्ह्यांचा यात समावेश आहे.
खिंडकरचा व्हायरल व्हिडिओवर खुलासा
मी सुरुवातीपासूनच देशमुख कुटुंबासोबत आहे. त्यांच्यापासून दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. हा व्हिडीओ माझा नाही. जो वाद होता तो आमच्या गावातील आणि कुटुंबातील होता, तो आता मिटला आहे. मला आणि देशमुख कुटुंबाला बदनाम करण्याचा हा प्रयत्न आहे, असा खुलासा दादासाहेब खिंडकर याने केला होता. मात्र, आज सकाळी खिंडकर पोलिसाला शरण आला. त्याला पिंपळनेर पोलिसांनी ताब्यात घेतले असून पुढील प्रक्रिया सुरू आहे.