बीडमध्ये सलोख्याचा भाव; पोलिसांच्या छातीवरील नेमप्लेटवरून वगळले आडनाव
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 13, 2025 18:13 IST2025-03-13T18:13:15+5:302025-03-13T18:13:59+5:30
पोलिस अधीक्षकांची संकल्पना यशस्वी; टेबल अन् छातीवरही पहिल्याच नावाची प्लेट

बीडमध्ये सलोख्याचा भाव; पोलिसांच्या छातीवरील नेमप्लेटवरून वगळले आडनाव
बीड : आडनावावरून काही लोकांनी पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवर जातीचे आरोप केले. हाच धागा पकडून पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी पहिल्या नावाने बोलण्यासह टेबलवर नेमप्लेट देण्याचा निर्णय घेतला. आता टेबलवर तर नेमप्लेट दिलीच परंतु छातीवरही पहिल्या नावाची प्लेट लागली आहे. अशी संकल्पना राज्यात पहिल्यांदाच बीडमध्ये राबविण्यात आली आहे.
जिल्ह्यात सध्या जातीयवाद वाढत चालला आहे. मागील आठवड्यापासून तर सोशल मीडियावर प्रचंड आरोप-प्रत्यारोप, अश्लील भाषा वापरली जात आहे. तसेच एखाद्याने पोलिसांबद्दल पोस्ट टाकली की त्याखाली जातीवाचक कॉमेंट्स केल्या जात आहेत. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतही असे अनेकदा झाले होते. यावर नूतन पोलिस अधीक्षक नवनीत काँवत यांनी हा जातीयवाद संपविण्यासाठी पोलिस दलातील प्रत्येकाने एकमेकांना पहिल्या नावाने बोलण्याचा आदेश काढला. त्यानंतर त्यांना टेबलवर ठेवण्यासाठी पहिल्या नावाची नेमप्लेट दिली. परंतु त्यानंतरही आता एक पाऊल पुढे टाकत खाकी वर्दीवर उजव्या बाजूला छातीवर असलेल्या नेमप्लेटमधूनही आडनाव वगळले आहे. अनेक अधिकारी, कर्मचाऱ्यांनी आता पहिलेच नाव प्लेटवर ठेवले आहे.
संकल्पनेचे स्वागत
पोलिस अधीक्षक काँवत यांनी राबविलेल्या या संकल्पनेचे सर्वस्तरातून स्वागत होत आहे. परंतु काही लोकांनी पोलिस नियमांवरही बोट ठेवले आहे. परंतु आपण हा निर्णय सकारात्मक भावनेतून घेतल्याचा दावा काँवत यांनी केला आहे.
आडनाव काढल्याचा परिणाम
एखादा गुन्हा दाखल करताना पीएसओ, तपास करताना अधिकारी, कर्मचारी किंवा बंदोबस्ताच्या ठिकाणी आडनाव पाहून काही लोक उगाचच टीका करतात. परंतु पोलिसांना कोणतीही जात नसते. जातीवर आम्ही काम करत नाहीत. जनतेची सुरक्षा करणे हाच आमचा प्रयत्न असतो. त्यामुळे हा जातीयवाद थांबवावा, असेही एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
वातावरण नक्कीच सलाेख्याचे दिसेल
पहिल्या नावाने बोलण्यासह इतर राबविलेल्या संकल्पना यशस्वी होत असल्याचे समाधान आहे. माझे सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी याला प्रतिसाद दिला. आगामी काळात जिल्ह्यातील वातावरण नक्कीच सलाेख्याचे दिसेल, असा विश्वास आहे.
- नवनीत काँवत, पोलिस अधीक्षक बीड