परळीत पशुधनाचा शाही थाट! ७५ लाखांची बुटकी म्हैस अन् ४५ लिटर दूध देणाऱ्या गाईने वेधले लक्ष
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2026 17:02 IST2026-02-14T17:01:10+5:302026-02-14T17:02:31+5:30
५० लाखांच्या ‘सोन्या’ बैलाचा मालकावर जीव; आठ लाखांचा परदेशी बकरा, सेलेब्रिटी घोड्यांचा जलवा

परळीत पशुधनाचा शाही थाट! ७५ लाखांची बुटकी म्हैस अन् ४५ लिटर दूध देणाऱ्या गाईने वेधले लक्ष
- संजय खाकरे
परळी : महाराष्ट्र शासनाच्या पशुसंवर्धन विभागातर्फे आयोजित ‘महा पशुधन एक्सपो २०२६’ मुळे परळीतील ओपळे मैदानावर जणू पशुसंपदेचा महाकुंभ भरला आहे. शुक्रवारी या प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी राज्यासह देशाच्या कानाकोपऱ्यातून आलेल्या दुर्मीळ, मौल्यवान आणि उच्च क्षमतेच्या पशुधनाने नागरिकांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. पशुपक्ष्यांच्या या अनोख्या विश्वात पहिल्याच दिवशी जनसागर लोटला होता.
या पशुधनाच्या उत्सवातून शेतकऱ्यांना केवळ मनोरंजनच नाही, तर आधुनिक तंत्रज्ञान, पशुखाद्य आणि पैदाशीच्या नव्या पद्धतींची माहिती मिळत आहे. पहिल्याच दिवशी झालेल्या या ऐतिहासिक गर्दीने परळी नगरी पशुमय झाली होती. परळीमध्ये तीन दिवस हा सोहळा भरणार आहे. शुक्रवारी पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाला. यावेळी आमदार धनंजय मुंडे यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
७५ लाखांची ‘वर्ल्ड रेकॉर्ड’वाली म्हैस
प्रदर्शनातील सर्वांत मोठे आश्चर्य ठरली ती साताऱ्याच्या माण तालुक्यातील त्रिंबक बोराटे यांनी आणलेली जगातील सर्वांत बुटकी म्हैस. अवघी दोन फूट आठ इंच उंची असलेल्या या म्हशीची किंमत तब्बल ७५ लाख रुपये असून, तिच्या नावे वर्ल्ड रेकॉर्डचे प्रमाणपत्र आहे. तिचे देखणे रूप आणि उंची पाहून आबालवृद्ध थक्क झाले.
‘ए सोन्या, पप्पी घे!’ : ५० लाखांच्या बैलाचा करिश्मा
बारामतीचा प्रसिद्ध हिंदकेसरी ‘सोन्या’ बैल ५० लाख रुपये किमतीचा असून तो प्रदर्शनाची शान ठरला आहे. पशुपालक संतोष कोकणे यांनी प्रेमाने ‘ए सोन्या, पप्पी घे!’ अशी साद देताच, सोन्याने मालकाच्या गालाचा मुका घेतला. हा भावुक क्षण पाहण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केली होती. सांगोला येथील आबा बंडगर यांचा बैलही अशाच प्रकारे कमांडवर पप्पी घेताना दिसला.
दुग्ध क्रांतीची झलक: ४५ लिटर दूध देणारी जर्सी
दुग्ध व्यवसायातील प्रगतीचे दर्शन घडवताना तब्बल ४५ लिटर दूध देण्याची क्षमता असलेली जर्सी गाय या प्रदर्शनात दाखल झाली आहे. ३५ पेक्षा अधिक उच्च दर्जाच्या गाईंसह मुऱ्हा जातीची दररोज १५ लिटर दूध देणारी म्हैसही शेतकऱ्यांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरली. लाल कंधारी, देवणी आणि गवळाऊ या देशी जातींच्या गोवंशानेही प्रदर्शनाची शोभा वाढवली.
सेलेब्रिटी घोडे, परदेशी पाहुणे
पंजाबचा प्रसिद्ध ‘फातेह’ हा रत्नाकर वंशाचा घोडा त्याच्या राजेशाही देहयष्टीमुळे आकर्षणाचे केंद्र ठरला आहे. तसेच, पुणे येथून आणलेला नेदरलँडच्या ‘सानेन’ जातीचा पांढराशुभ्र बकरा, ज्याची किंमत आठ लाख रुपये आहे, तो पाहण्यासाठी शेळीपालकांनी मोठी रांग लावली होती. याशिवाय काश्मिरी फाइटर बकरा आणि रिंगमधून उड्या मारणारे प्रशिक्षित श्वान तरुणाईला आकर्षित करत आहेत.