उसतोड कामगार कुटुंबावर दुःखाचा डोंगर; बुडणाऱ्या चिमुकल्याला वाचविताना आईचाही मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2022 18:22 IST2022-11-18T18:20:09+5:302022-11-18T18:22:06+5:30
आईसोबत पाणी भरण्यासाठी जाताना पाय घसरून रस्त्यातील विहिरीत चिमुकला बुडाला

उसतोड कामगार कुटुंबावर दुःखाचा डोंगर; बुडणाऱ्या चिमुकल्याला वाचविताना आईचाही मृत्यू
केज (बीड) : तालुक्यातून ऊसतोडणीला गेलेल्या मायलेकाचा विहिरीत बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना उस्मानाबाद जिल्ह्यातील विठ्ठल साई साखर कारखाना आवारात आज सकाळी घडली. चार वर्षाच्या लेकरांला वाचवताना आई देखील विहिरीत बुडाली. सोहम ( 4 ) आणि सोनाली संतोष घुले ( 24 ) अशी मृतांची नावे आहेत.
याबाबत मिळालेल्या माहितीनूसार, केज तालुक्यातील जीवाचीवाडी येथील संतोष दशरथ घुले हे आपल्या कुटूंबासह उस्मानाबाद जिल्ह्यातील उमरगा तालुक्यात विठ्ठलसाई साखर कारखान्यावर आपल्या बैलगाडीने ऊसतोड करण्यासाठी गेले आहेत. आज सकाळी 11 वाजेच्या सुमारास संतोष घुले यांच्या पत्नी सोनाली संतोष घुले (24) पाणी आणण्यासाठी कारखान्याच्या आवारात असलेल्या पाण्याच्या हौदावर 4 वर्षांचा मुलगा सोहमसह गेल्या होत्या.
यावेळी पाय घसरून सोहम शेजारी असलेल्या विहिरीत पडला. हे पाहताच त्याला वाचविण्यासाठी सोनालीने विहिरीत उडी घेतली. परंतु, मायलेक दोघेही त्यात बुडाले. मुलाला वाचवण्याचा प्रयत्न करणारी आई देखील विहिरीत बुडाल्याचे लक्षात येताच नागरिकांनी गर्दी केली. काही वेळाने दोघांचे मृतदेह बाहेर काढण्यात बचाव पथकाला यश आले आहे.