बीडच्या उसतोड कुटुंबावर कर्नाटकात दुःखाचा डोंगर; ट्रॉलीतून निसटून चिमुकली चिरडली गेली!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 27, 2025 15:09 IST2025-10-27T15:06:31+5:302025-10-27T15:09:03+5:30
हृदय हेलावणारी घटना! ऊसतोडीसाठी निघालेल्या कुटुंबावर काळाचा घाला

बीडच्या उसतोड कुटुंबावर कर्नाटकात दुःखाचा डोंगर; ट्रॉलीतून निसटून चिमुकली चिरडली गेली!
दिंद्रुड (बीड): ऊसतोड कामगारांच्या स्थलांतराचा हृदयद्रावक चेहरा पुन्हा एकदा समोर आला आहे. धारूर तालुक्यातील देवदहिफळ येथील अडीच वर्षीय आरोही विशाल बडे या चिमुकलीचा कर्नाटक राज्यातील कोल्हारजवळ ट्रॅक्टरच्या ट्रॉलीखाली चिरडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना रविवारी सकाळी साडेदहा वाजता घडली. एकुलती एक मुलगी अपघातात गमावल्याने बडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
देवदहिफळ येथील महादेव बडे हे ऊसतोड मुकादम आहेत. त्यांचे पुत्र विशाल बडे हे कर्नाटक राज्यातील बैलहोंगल तालुक्यातील सोमेश्वर सहकारी साखर कारखान्याकडे ऊस वाहतुकीचे काम पाहतात. शुक्रवारी रात्री विशाल बडे हे पत्नी आरती, मुलगा अविराज आणि मुलगी आरोहीसह ट्रॅक्टरने कर्नाटकला कामासाठी निघाले होते. ऊसतोड कामगारांच्या मुलांच्या नशिबी येणारे हे स्थलांतरण या निष्पाप जीवासाठी अखेरचे ठरले.
आईच्या हातून निसटली 'कळी'
रविवारी सकाळी कोल्हारजवळ चहापाणी घेऊन हे कुटुंब पुन्हा साखर कारखान्याच्या दिशेने निघाले होते. यावेळी आरोही समोरील ट्रॉलीत आपल्या आईच्या कुशीत बसली होती. मात्र, अचानक ती आईच्या हातातून निसटली आणि पाठीमागील ट्रॉलीच्या चाकाखाली आली. ट्रॉलीखाली आल्यामुळे आरोहीचा जागीच मृत्यू झाला. या घटनेनंतर आई-वडिलांनी केलेला टाहो हृदय पिळवटून टाकणारा होता. एका क्षणात डोळ्यांदेखत त्यांचा छोटासा संसार उधळला गेला. कोल्हार येथील सरकारी दवाखान्यात शवविच्छेदन झाल्यानंतर रविवारी मध्यरात्री शोकाकुल वातावरणात देवदहिफळ येथे आरोहीवर अंत्यसंस्कार करण्यात आले. या घटनेमुळे बडे कुटुंबावर तसेच देवदहिफळ गावावर शोककळा पसरली आहे. ऊसतोड कामगारांच्या स्थलांतराचा धोका आणि मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.