अर्धवट रस्ता ठरतोय जीवघेणा; बसच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2023 20:48 IST2023-01-18T20:48:31+5:302023-01-18T20:48:46+5:30
अंबाजोगाई येथील लोखंडी सावरगावजवळ पुन्हा झाला अपघात

अर्धवट रस्ता ठरतोय जीवघेणा; बसच्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू, दोघे गंभीर जखमी
अंबाजोगाई - लोखंडी सावरगाव जवळील भरधाव वेगातील बसने दुचाकीला समोरासमोर दिलेल्या धडकेत दुचाकीवरील एकाचा मृत्यू झाला तर दोघांची प्रकृती चिंताजनक आहे. हा अपघात बुधवारी (दि.१८) दुपारी साडेचार वाजताच्या सुमारास झाला. संजय अंकुश डहाणे (वय ५०, रा. कोदरी, ता. अंबाजोगाई) असे अपघातातील मृत व्यक्तीचे नाव आहे.
पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, कोदरी येथील संजय डहाणे, रवींद्र दगडू जाधव (वय ५३) आणि बालासाहेब शेषेराव कदम (वय ४७) हे तिघेजण अंबाजोगाईहून दुपारी गावाकडे दुचाकीवरून (एमएच ४४ एन ४३५२) निघाले होते. ते लोखंडी सावरगावच्या पेट्रोल पंपाच्या पुढे आले असता समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या औरंगाबाद - अंबाजोगाई एसटी बसने (एमएच २० बीएल ०५१४) त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. या अपघातात दुचाकीवरील तिघेही गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अंबाजोगाईच्या स्वाराती रुग्णालयात दाखल केले असता तिथे उपचार सुरु असताना संजय यांचा मृत्यू झाला. तर, उर्वरित दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूरला हलवण्यात आले आहे.
अर्धवट रस्ता ठरतोय जीवघेणा
दरम्यान, महामार्गाच्या कंत्राटदाराने या रस्त्यावरील काही जागावरील काम विनाकारण अपूर्ण सोडले आहेत. त्यामुळे अनेकदा अपघात होऊन निष्पाप नागरिकांचा बळी जात आहे. चार दिवसापूर्वीच या ठिकाणी फोर्म्युनर आणि रिक्षाच्या धडकेत तरुणाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर आज पुन्हा एकाला जीव गमवावा लागला. त्यामुळे रस्त्याची कामे तातडीने पूर्ण करावीत अशी मागणी होत आहे.