शॉट सर्किटमुळे गोठा जळून खाक; एक म्हैस दावे तोडून पळाल्याने इतर पशुधन वाचले
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2023 19:03 IST2023-01-25T19:03:15+5:302023-01-25T19:03:53+5:30
आगीत ४ म्हशी, ३ वासरे होरपळली, लाखोंच्या शेतमालाची राख झाली आहे

शॉट सर्किटमुळे गोठा जळून खाक; एक म्हैस दावे तोडून पळाल्याने इतर पशुधन वाचले
- मधुकर सिरसट
केज ( बीड) : शेतातील गोठ्याला शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याने सोयाबीन, कापूस, केबल वायर, पेंड, दिवाण, कपडे आदी साहित्य जळून खाक झाले. तर ४ म्हशी आणि ३ वासरे गंभीररित्या भाजल्याने शेतकरी गोविंद बारगजे यांचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना मंगळवारी सायंकाळी टाकळी येथे घडली.
गोविंद बारगजे हे टाकळीपासून जवळच असलेल्या डोणगाव येथे बैलगाडीद्वारे ऊसतोडीचे काम करतात. मंगळवारी सकाळी गोठ्यात 4 म्हशी, 3 वासरे बांधून बारगजे ऊस तोडणीसाठी गेले. दरम्यान, शॉर्ट सर्किटमुळे गोठ्यात अचानक आग लागली. यात 20 पोते सोयाबीन, 5 क्विंटल कापूस, 5 क्विंटल पेंड, केबल वायर, दिवाण, कपडे आणि गृहोपयोगी साहित्य जळून खाक झाले. तर 4 म्हशी, 3 वासरे गंभीररीत्या भाजले आहेत. यात शेतकऱ्याचे जवळपास 2 लाखांचे नुकसान झाले आहे. नुकसानीचा पंचनामा करून शासकीय मदत देण्याची मागणी बारगजे यांनी तहसीलदार डी. सी. मेंडके यांच्याकडे केली आहे.
एक म्हैस दावे तोडून पळाल्याने वाचले इतरांचे प्राण
आगीत होरपळलेल्याने एक म्हैस दावे तोडून गोठयाबाहेर आली. तेव्हा शेजारच्या शेतकऱ्यांचे लक्ष गोठ्याकडे गेले. त्यानंतर नाथ्याबा बारगजे यांनी लागलीच 3 म्हशी व वासराचे दावे कुऱ्हाडीने तोडले. यामुळे त्यांचे प्राण वाचले मात्र म्हणी आणि वासरे गंभीर भाजले आहेत. पशुधन विकास अधिकारी डॉ. प्रीतमकुमार आचार्य त्यांच्यावर उपचार केले. याप्रकरणी आपत्कालीन पंचनामा करण्याचे आदेश संबंधित तलाठी आणि मंडळाधिकाऱ्यांना दिल्याची माहिती तहसीलदार डी. सी. मेंडके यांनी दिली आहे.