भीषण अपघातात परळीतील व्यापाऱ्यासह चालक ठार; कारचा चक्काचूर, केज तालुक्यातील घटना
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2025 15:37 IST2025-09-16T15:36:38+5:302025-09-16T15:37:34+5:30
अहमदपूर-अहिल्यानगर महामार्गावर अपघात; मुंबईहून परळीला जाणाऱ्या कारने पुलाच्या कठड्याला दिली धडक, दोघांचा जागीच मृत्यू

भीषण अपघातात परळीतील व्यापाऱ्यासह चालक ठार; कारचा चक्काचूर, केज तालुक्यातील घटना
- मधुकर सिरसट
केज ( बीड) : मुंबई येथून परळीकडे जाणारी कार पुलाच्या कठड्याला धडकून झालेल्या भीषण अपघातात परळी येथील एका व्यापाऱ्यांसह, कारचालक असे दोघेही जागीच ठार झाले. हा भीषण अपघात मंगळवारी (दि. 16 ) पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान केज तालुक्यातील कदमवाडी शिवारात झाला. अपघातात कार चक्काचूर झाली आहे.
परळी येथील बूट,चप्पलचे ठोक विक्रेते इम्रान कच्छी आणि त्यांचा कारचालक अझरुद्दीन बाबामियाँ शेख हे दोघेजण सोमवारी रात्री मुंबई येथून कारने ( एम एच 02 सी एच 6789) परळीकडे प्रवास करत होते. मंगळवारी ( दि. 16 ) पहाटे 5 वाजण्याच्या दरम्यान अहमदपूर -अहिल्यानगर या राष्ट्रीय महामार्गांवर केज तालुक्यातील कदमवाडी शिवारातील पुलाजवळ कारचालकाला डुलकी लागली. यामुळे नियंत्रण सुटून भरधाव कार पुलाच्या कठड्यावर धडकली. या भीषण अपघातात इम्रान इब्राहिम कच्छी (50) आणि चालक अझरुद्दीन बाबामिया शेख (40 , दोघे रा. परळी ) हे जागीच ठार झाले.
माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक उमेश निकम, सहाय्यक उप निरीक्षक अशोक सोनवणे, पोलीस नाईक रशीद शेख, व चालक शिंदे यांनी अपघातस्थळी धाव घेतली. पोलिसांनी प्रशांत नेहरकर आणि सुमित तेलंग यांच्या रुग्णवाहिकेतून जखमीना केज येथील रुग्णालयात रवाना केले. येथे तपासणी करून डॉक्टरांनी दोघांनाही मृत घोषित केले. डॉ. आयेशा शेख यांनी मृतदेहांचे शवविच्छेदन केले. दुपारी साडेबारा वाजण्याच्या दरम्यान दोघांचेही पार्थिव नातेवाईकांच्या स्वाधीन करण्यात आले. दोघांवर ही परळी येथे दफनविधी संस्कार करण्यात आले.