भरधाव शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 13, 2023 15:43 IST2023-01-13T15:42:42+5:302023-01-13T15:43:42+5:30
औरंगाबाद- लातूर शिवशाही बसने दिली दुचाकीला धडक

भरधाव शिवशाही बसच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू
- मधुकर सिरसट
केज (बीड) : केज - अंबाजोगाई महामार्गांवर कृषी विज्ञान केंद्राजवळ आज सकाळी ११ वाजता शिवशाही बसने पाठीमागून दिलेल्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. धम्मपाल साखरे असे मृताचे नाव आहे.
औरंगाबाद- लातूर शिवशाही बस ( क्र. MH 06 / BW 0887) केजहून लातूरकडे सकाळी रवाना झाली. सकाळी ११ वाजेच्या सुमारास कृषी विज्ञान केंद्राजवळ उमराई फाट्यावर धम्मपाल साखरे हा दुचाकीस्वार बसला ओव्हरटेक करून पुढे गेला. यादरम्यान भरधाव बसने दुचाकीला पाठीमागून जोरदार धडक दिली. यात गंभीर जखमी झालेल्या धम्मपाल साखरेचा जागीच मृत्यू झाला. युसूफवाडगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी अंबाजोगाई येथील स्वराती रुग्णालयात पाठविण्यात आला असून पुढील कारवाई सुरु आहे.