परळीत बॅनर युद्ध! 'ते' वाल्मिक कराडचा फोटाे लावतील, तर तुम्ही बबन गित्तेचा लावा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2025 18:04 IST2025-11-03T18:01:52+5:302025-11-03T18:04:00+5:30
परळीत वाल्मीक कराड विरुद्ध बबन गित्ते; दोन नेत्यांभोवती फिरणार आता स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक

परळीत बॅनर युद्ध! 'ते' वाल्मिक कराडचा फोटाे लावतील, तर तुम्ही बबन गित्तेचा लावा!
परळी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) आता सज्ज झाला आहे. यापुढे आपल्या बॅनरवर बबन गित्तेंचा फोटो लावा, असे निर्देश पक्षाचे जिल्हा सरचिटणीस व परळीचे माजी तालुकाध्यक्ष देवराव लुगडे यांनी कार्यकर्त्यांना दिले. परळीत बापू आंधळे खून प्रकरणात बबन गित्ते हे आरोपी आहेत. बबन गित्ते हे राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार पक्षाचे परळीतील नेते आहेत. ते सध्या पक्षकार्यात सक्रिय नाहीत. बॅनरवर कराड यांचे फोटो समर्थक लावत असल्याने लुगडे यांनी हे विधान केले.
परळी येथील शासकीय विश्रामगृहात गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आढावा बैठक झाली. या बैठकीत देवराव लुगडे म्हणाले की, ते जर वाल्मीक कराड यांचे फोटो बॅनरवर लावत असतील, तर आपल्याला आपल्या पक्षाचे बबन गित्ते यांचे फोटो बॅनरवर दिसावेत. बबन गित्ते हे शंभर टक्के निर्दोष आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन परळीत विरोधी शक्तीला तोंड देऊ, असेही लुगडे म्हणाले. या बैठकीला प्रकृती ठीक नसल्याने खासदार बजरंग सोनवणे यांची अनुपस्थिती होती, अशी माहिती परळी तालुकाध्यक्ष बाबा शिंदे यांनी दिली.
या बैठकीत ज्येष्ठ नेते राजसाहेब देशमुख, राजेभाऊ फड, फुलचंद कराड, प्रभाकर वाघमोडे, बाळासाहेब देशमुख आदी उपस्थित होते. तालुकाध्यक्ष बाबासाहेब शिंदे पाटील, शहराध्यक्ष ॲड. जीवनराव देशमुख, ॲड. कल्पना देशमुख, अंकुश राठोड, गणेश देवकते, मुक्ताराम गवळी, अश्विनी सोळंके आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी नगर परिषद, सर्व ६ जिल्हा परिषद गट व १२ पंचायत समिती गटांमध्ये पक्ष पूर्ण ताकदीने निवडणुका लढवणार आणि जिंकणार, असा विश्वास व्यक्त केला. प्रास्ताविक बाबासाहेब शिंदे पाटील, तर सूत्रसंचालन ॲड. अर्जुन सोळंके यांनी केले. आभार ॲड. जीवनराव देशमुख यांनी मानले.