संतोष देशमुख हत्या: सीआयडीच्या आरोपपत्रात नावे असलेले 'ते' आठ आरोपी कोण?
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2025 15:06 IST2025-03-01T15:04:44+5:302025-03-01T15:06:23+5:30
Santosh Deshmukh Case: मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सीआयडीने दाखल केलेल्या आरोपपत्रातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. या हत्या कांडात वाल्मीक कराड प्रमुख आरोपी असल्याचे सीआयडीने म्हटले आहे.

संतोष देशमुख हत्या: सीआयडीच्या आरोपपत्रात नावे असलेले 'ते' आठ आरोपी कोण?
Santosh Deshmukh Case: संतोष देशमुख हत्या प्रकरणासह एकूण तीन गुन्ह्यात सीआयडीने एकत्रित आरोपपत्र दाखल केले आहे. यात खंडणीच्या प्रकरणातूनच मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली असून, वाल्मीक कराड हाच याचा मुख्य सूत्रधार असल्याचे आरोपपत्रात म्हटले गेले आहे. त्यामुळे इतक्या दिवसांपासून देशमुख कुटुंबीय आणि इतरांकडून वाल्मीक कराडवर केल्या जाणाऱ्या आरोपांना कागदोपत्री दुजोरा मिळाला आहे.
'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!
सीआयडीने संतोष देशमुख हत्या, दोन कोटींची खंडणी आणि अॅट्रॉसिटी गुन्हा या तिन्ही प्रकरणात १५०० पानी आरोपपत्र केज न्यायालयात दाखल केले आहे. यातील काही मुद्दे आता समोर आले असून, यात आठ प्रमुख आरोपी करण्यात आले आहेत. वाल्मीक कराडला सूत्रधार ठरवण्यात आले असून, त्याचे नाव पहिल्या क्रमांकावर आहेत.
संतोष देशमुख हत्या: सीआयडीच्या आरोपपत्रातील आरोपींची नावे
1) वाल्मीक कराड
2) विष्णू चाटे
3) सुदर्शन घुले
4) प्रतिक घुले
5) जयराम चाटे
6) सुधीर सांगळे
7) सिद्धार्थ सोनवणे
8) कृष्णा आंधळे
खंडणी आणि हत्या; कृत्यानुसार आरोपींची क्रमवारी
गोपनीय साक्षीदारांनी दिलेले जबाब, संतोष देशमुख यांना बेदम मारहाण करताना झालेला व्हिडीओ कॉल, या आधारे या गुन्ह्यात केलेल्या कृत्यानुसार क्रमवारी ठरवण्यात आले आहे. खंडणीच्या प्रकरणात संतोष देशमुख अडथळा ठरत असल्याने वाल्मीक कराडनेच त्याला मारायला सांगितले होते, असे आरोपपत्रात आहे. म्हणजेच वाल्मीक कराडच्या आदेशावरूनच संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आली.
संतोष देशमुख यांच्या हत्याकांड विष्णू चाटे आणि सुदर्शन घुले यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनीच अपहरण आणि हत्येचा कट रचला. त्यामुळे दुसऱ्या क्रमांकावर विष्णू चाटे, तर तिसऱ्या क्रमांकावर सुदर्शन घुले याचे नाव आरोपींमध्ये आहे. संतोष देशमुख यांना सर्वाधिक मारहाण सुदर्शन घुले याने केल्याचेही पुरावे मिळाले आहेत. त्यानंतर इतर आरोपींची नावे आहेत.
कृष्णा आंधळे फरार, पण...
या हत्या प्रकरणातील शेवटचा आरोपी कृष्णा आंधळे आहे. तो फरार आहे. त्याचा थांगपत्ता लागलेला नाही. कृष्णा आंधळे याला संपवण्यात आल्याचे दावे बीड जिल्ह्यातील महायुती आणि विरोधी पक्षातील आमदारांकडून करण्यात आले आहेत. संतोष देशमुख हत्या प्रकरणाला तीन महिने लोटले तरी कृष्णा आंधळेला अटक करण्यात यश आलेले नाही.