६५ वर्षांच्या इंदूबाईने पाहिला जवळून मृत्यू; बिबट्याच्या हल्ल्यात जनावरांमुळे वाचले प्राण
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2024 18:55 IST2024-08-16T18:54:01+5:302024-08-16T18:55:25+5:30
बिबट्या अचानक आल्याने चरणारी जनावरेही सैरभर झाली. यावेळी परिसरातील गुराख्यांनीही आरडाओरड केली.

६५ वर्षांच्या इंदूबाईने पाहिला जवळून मृत्यू; बिबट्याच्या हल्ल्यात जनावरांमुळे वाचले प्राण
- नितीन कांबळे
कडा (जि. बीड) : वेळ दुपारच्या दीडची, ठिकाण वंजारवाडी परिसर, ठिकठिकाणी चरत असलेली जनावरे आणि मोबाइलमध्ये दंग झालेली शेतकरी, गुराखी. एवढ्यात अचानक दबा धरून बसलेल्या बिबट्याने जनावरांच्या कळपात एन्ट्री केली, तोच जनावरांमध्ये पळापळ सुरू झाली. या धावपळीत ६५ वर्षांच्या इंदूबाई उत्तम महाजन यांच्यावर हल्ला करून बिबट्या जंगलात पसार झाला. वयोवृद्ध महिलेने मृत्यू डोळ्याने पाहिल्याचे बोलून दाखविले.
आष्टी तालुक्यातील वंजारवाडी येथील इंदूबाई उत्तम महाजन ह्या घरापासून एक किलोमीटर अंतरावर असलेल्या शेतात बुधवारी जनावरे चारत होत्या. दुपारी अचानक बिबट्याने हल्ला केल्याने त्या जखमी झाल्या. त्यांच्या हाताला गंभीर जखम झाली असून, खाली पडल्याने छातीत मार लागला आहे. दरम्यान बिबट्या अचानक आल्याने चरणारी जनावरेही सैरभर झाली. यावेळी परिसरातील गुराख्यांनीही आरडाओरड केली. त्यामुळे बिबट्याने जंगलाकडे काढता पाय घेतला. इंदूबाई यांच्यावर धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत. ही माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी वनपाल बाबासाहेब मोहळकर, वनरक्षक किरण पंडलवार,आश्रुबा दहिफळे यांनी भेट देत पाहणी केली.
वंजारवाडी परिसरात बिबट्याचे अनेक दिवसांपासून वास्तव असून, वन विभागाकडून कसलीच ठोस उपाययोजना होत नाही. एखाद्याचा जीव जाण्याआधी वन विभागाने तातडीने पिंजरे लावून बिबट्याचा बंदोबस्त करण्याची मागणी आष्टी तालुका दूध संघाचे चेअरमन संजय गाढवे यांनी केली आहे. बिबट्याने हल्ला केल्याची घटना घडल्याची माहिती मिळताच जयदत्त धस यांनी धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट देऊन महिलेची विचारपूस करत अधिकाऱ्यांना त्वरित उपाययोजना करण्याचे सुचविले.