अंबाजोगाईत १६ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 8, 2018 15:46 IST2018-05-08T15:46:48+5:302018-05-08T15:46:48+5:30

: उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मित्रांसोबत पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी अंबाजोगाई शहरातील कंपनी बाग परिसरात घडली.

A 16-year-old student dies in Ambajogai | अंबाजोगाईत १६ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

अंबाजोगाईत १६ वर्षीय विद्यार्थ्याचा बुडून मृत्यू

अंबाजोगाई (बीड ) : उन्हाळ्याच्या सुट्टीनिमित्त मित्रांसोबत पोहण्यासाठी विहिरीवर गेलेल्या विद्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना आज सकाळी अंबाजोगाई शहरातील कंपनी बाग परिसरात घडली.

यश नंदकुमार देशपांडे (वय १६) असे या दुर्दैवी मुलाचे नाव आहे. आज मंगळवारी सकाळी तो अन्य दोन मित्रांसोबत कंपनी बाग परिसरातील विहिरीवर पोहण्यासाठी गेला होता. परंतु, पोहण्यात तरबेज नसल्याने तो अचानक पाण्यात बुडाला. यावेळी तिथे पोहण्यासाठी आलेल्या शेख अफजल या तरुणाने विहिरीत उडी मारून बुडालेल्या यशला बाहेर काढले. त्यानंतर बेशुद्धावस्थेत असणाऱ्या यशला तातडीने जवळच असलेल्या स्वाराती रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु तिथे डॉक्टरांनी तपासून त्याला मयत घोषित केले.

यश हा पाटबंधारे खात्यातील सेवानिवृत्त कर्मचारी नंदकुमार देशपांडे यांचा मुलगा होता. योगेश्वरी नूतन शाळेचा विद्यार्थी असलेल्या यशने नुकतीच दहावीची परीक्षा दिली होती. तो एक उत्तम फुटबॉलपटू आणि निष्णात खो-खो खेळाडू होता अशी माहिती त्याच्या शिक्षकांनी दिली. अतिशय शांत स्वभावाच्या आणि शिक्षणासोबतच खेळातही अग्रेसर असलेल्या गुणी यशच्या अकाली मृत्यूने त्याचे नातेवाईक, शिक्षक आणि मित्रपरिवारावर शोककळा पसरली आहे.

Web Title: A 16-year-old student dies in Ambajogai