वेताळवाडीत १६ वर्षीय मुलीने संपवले जीवन; आष्टीत तीन दिवसांत २ अल्पवयीन मुलींच्या आत्महत्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2023 12:39 IST2023-03-30T12:38:38+5:302023-03-30T12:39:05+5:30
या दोन्ही मुलींच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.

वेताळवाडीत १६ वर्षीय मुलीने संपवले जीवन; आष्टीत तीन दिवसांत २ अल्पवयीन मुलींच्या आत्महत्या
- नितीन कांबळे
कडा (बीड) :बीडसांगवी येथे आजोळी राहत असलेल्या एका १३ वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच बुधवारी रात्री सात वाजेच्या दरम्यान वेताळवाडी येथे देखील अल्पवयीन मुलीने राहत्या घरी आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. प्रतिक्षा सुरेश वनवे (१६) असे वेताळवाडी येथील मृत मुलीचे नाव आहे. आष्टी तालुक्यात तीन दिवसांत दोन अल्पवयीन मुलींनी आत्महत्या केल्याने खळबळ उडाली आहे.
आष्टी तालुक्यातील वेताळवाडी येथील प्रतिक्षा सुरेश वनवे ( १६ ) हिने बुधवारी रात्री सातच्या दरम्यान राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. नातेवाईकांच्या माहितीनंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मृतदेह आष्टी येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी रवाना करण्यात आला. आष्टी पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरु आहे.
तीन दिवसांत दोन मुलींच्या आत्महत्या
बीडसांगवी येथे आजोळी राहत असलेल्या एका १३ वर्षीय मुलीने सोमवारी सायंकाळी ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन जिवन संपवले. त्यानंतर बुधवारी रात्री वेताळवाडी येथील १६ वर्षीय मुलीने देखील ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन जिवन संपविले. या दोन्ही मुलींच्या आत्महत्येचे कारण अस्पष्ट आहे.