कडा येथील १२१ शेतकऱ्यांची २०१५ मध्ये अहमदनगर-बीड-परळी रेल्वे मार्गासाठी जमीन अतिरिक्त संपादित झाली होती. या अतिरिक्त संपादित जमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना मिळालेला नव्हता. याबाबत आष्टी, पाटोदा, शिरूर विधानसभा अध्यक्ष रवी ढोबळे यांचे गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. त्यांनी आष्टी येथील तहसील कार्यालय, विभागीय अधिकारी पाटोदा तसेच बीड जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांची प्रत्यक्ष भेट घेऊन अतिरिक्त संपादित झालेल्या शेत जमिनीचा मावेजा शेतकऱ्यांना मिळावा यासाठी प्रयत्न केले.
तसेच राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांची ढोबळे यांनी प्रत्यक्ष भेट घेऊन शेतकऱ्यांना संपादित जमिनीचा मावेजा मिळण्यासाठी पाठपुरावा केलेला होता. त्यानुसार पाटोदा येथील उपविभागीय अधिकारी यांना जिल्हाधिकारी यांनी संबंधित शेतकऱ्यांचा मावेजा तत्काळ देण्यात यावा व तसा अहवाल या कार्यालयास सादर करावा असे आदेशीत केले होते. अखेर अखेर ढोबळे त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन कडा येथील १२१ शेतकऱ्यांना ४८ कोटी रुपये अतिरिक्त जमिनीचा मावेजा मिळाला आहे. हा मावेजा ज्या त्या शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा झालेला असून सर्व शेतकऱ्यांनी रवी ढोबळे यांचे आभार व्यक्त केले आहेत.