12-year-old girl's sand dunes passing through her eyes; Health screening has come with shocking truth | 12 वर्षीय मुलीच्या डोळ्यातून निघायचे वाळूचे खडे; आरोग्य तपासणीत धक्कादायक सत्य आले समोर
12 वर्षीय मुलीच्या डोळ्यातून निघायचे वाळूचे खडे; आरोग्य तपासणीत धक्कादायक सत्य आले समोर

ठळक मुद्दे बीडमधील आरोग्य यंत्रणेची सुट्टीच्या दिवशीही धावपळ 

- सोमनाथ खताळ
बीड : बीडमध्ये एका १२ वर्षाच्या मुलीच्या डोळ्यातून  वाळूचे खडे पडत असल्याचा व्हिडीओ मागील चार दिसांपासून संपूर्ण राज्यात व्हायरल झाला आहे. त्यानंतर बीडची आरोग्य यंत्रणा रविवारी सुट्टी दिवशीही कामाला लागली. वैद्यकीय तपासण्या केल्यावर तिला कसलाच आजार दिसला नाही. आई आणि मुलीला दहा मिनिटांसाठी बाजूला बसविताच तिने आपल्या हाताने डोळ्यात खडे टाकले आणि नंतर ते बाहेर काढले. हे वास्तव समोर येताच सर्वांनाच धक्का बसला. 

बीड शहरातील गोविंद नगर भागात एक कुटूंब मोलमजुरी करून उदरनिर्वाह भागवित असून त्यांना चार मुली आहेत.दुस-या क्रमांकाची शिवाणीच्या (वय १२ वर्षे, नाव बदलले) डोळ्यातून वाळूचे खडे येत असल्याचे दिसून आले. तिच्या आईने व्हिडीओ तयार केला. तो सोशल मिडीयावर व्हायरल केला. मिडीयाला माहिती देऊन याचा मोठा बोभाटा केला. रविवारी सकाळी ‘लोकमत’ने या मुलीची भेट घेतली. खडे निघत असल्याचे समजताच जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांना माहिती दिली. डॉ.थोरात यांनी सदरील मुलीला जिल्हा रूग्णालयात आणून नेत्र विभागाला तपासणीचे आदेश दिले. सर्व तपासण्या केल्यावर कसलाच आजार दिसला नाही. 
त्यानंतर एक तास वाट पाहिली. तिच्या डोळ्यातून खडे आले नाहीत.

त्यानंतर शक्कल लढवून तीनच खडे काढून ते मुलीच्या हातात दिले. आईलाही तिच्यासोबत पाठविण्यात आले. एक तास वाट पाहिल्यावर खडे आले नव्हते. मात्र, आई जवळ जाताच अवघ्या पाच मिनीटांत डोळ्यातून खडा बाहेर आला. त्यानंतर पुन्हा सात खडे देण्यात आले. १५ मिनीटांनी त्यातील एक खडा गायब होता. तो पाच मिनीटांनी मुलीच्या डोळ्यातून निघाला. त्यानंतर हा सर्व प्रकार खोटा असल्याचे समोर आले. या खोट्या प्रकाराने मात्र, संपूर्ण नेत्र विभाग रविवारच्या दिवशीही रूग्णालयात दिवसभर ठाण मांडून होता.

जिल्हा शल्य चिकित्सक डॉ.अशोक थोरात यांच्यासह नेत्र तज्ज्ञ डॉ.चंद्रकांत वाघ, डॉ.राधेश्याम जाजू, डॉ.नितीन रेंगे, टेक्निशिअन महाविर मांडवे, विशांत मोराळे, रमेश सौंदरमल, परिचारीका डोरले आदी यंत्रणा दिवसभर या मुलीवर उपचार करीत होते.

सहानुभूती मिळविण्याचा प्रकार?
हा सर्व प्रकार केवळ सहानुभूती मिळविण्यासाठी केल्याचा संशय आहे. हे वास्तव उघड झाल्यावर सदरील महिलेला विचारणा केल्यावर तिने आश्रु आणत विषयाला बगल दिली. डॉक्टरांनी तिचे समुपदेशनही केले. त्यानंतर सोनल पाटील यांनीही समजुत काढली मग तिचे आश्रु थांबले. तिला आपली चुक लक्षात आल्यावर तिने शांत होऊन काढता पाय घेतला. मात्र, या सर्व प्रकारामुळे यंत्रणेची चांगलीच धावपळ झाली. 

डोळ्यातून निघालेले खडे हे वाळूचे असावेत. असा कुठलाही खडा माणसाच्या शरिरात तयार होत नाही, किंवा जास्त दिवस राहू शकत नाही. पोटात खडा असला तरी तो डोळ्यातून निघण्याचा संबंधच येत नाही. ही सर्व बनवाबनवी असल्याचे दिसून आले. बाहेरून खडे टाकल्यामुळे मुलीच्या डोळ्याला जखम होत आहे. तसेच ते लालही झाले आहेत. खड्यांचे इन्फेक्शन होऊ शकते, कॉर्नियाला इन्फेक्शन झाले तर कायमचा आंधळेपणा येऊ शकतो.
- डॉ.चंद्रकांत वाघ
नेत्रतज्ज्ञ, जिल्हा रूग्णालय बीड,


Web Title: 12-year-old girl's sand dunes passing through her eyes; Health screening has come with shocking truth
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.