शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2025 16:44 IST2025-08-12T16:44:00+5:302025-08-12T16:44:55+5:30
Xiaomi YU7: स्मार्टफोनसह अनेक गॅझेट्स बनवणारी कंपनी शाओमीच्या इलेक्ट्रिक कारने ग्राहकांना वेड लावले आहे.

शाओमी YU7 च्या खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड, अवघ्या दोन मिनिटांत ३ लाख बुकींग!
स्मार्टफोनसह अनेक गॅझेट्स बनवणारी कंपनी शाओमीच्या इलेक्ट्रिक कारने ग्राहकांना वेड लावले आहे. इलेक्ट्रिक एसयूव्ही शाओमी YU7 च्या विक्रीपूर्वीच खरेदीसाठी ग्राहकांची एकच गर्दी उसळलेली पाहायला मिळाली. अवघ्या दोन मिनिटांत २ लाख लोकांनी या कारची बुकींग केली. एका तासात हा आकडा दोन लाख ८९ हजार युनिट्सवर पोहोचला. कंपनीकडून ६ लाख युनिट्सची विक्री करण्यात आली.
शाओमी YU7 ची रचना पोर्श मॅकन आणि फेरारी पुरोसांग्यूसारखी आहे. ही एसयूव्ही रियर-व्हील ड्राइव्ह आणि ऑल-व्हील ड्राइव्ह दोन प्रकारांमध्ये लॉन्च करण्यात आली. या एसयूव्हीमध्ये बसवलेल्या इलेक्ट्रिक मोटरमध्ये २८८ किलोवॅट पॉवर आणि ५२८ एनएम टॉर्क जनरेट करण्याची क्षमता आहे.
तीन वेगवेगळ्या बॅटरी व्हेरिएंटसह लॉन्च
शाओमी YU7 ला तीन वेगवेगळ्या बॅटरी व्हेरिएंटसह लॉन्च करण्यात आली, पहिल्या व्हेरिएंटमध्ये ९६.३ किलोवॅटची बॅटरी आहे जी रियर-व्हील ड्राइव्ह कॉन्फिगरेशनमध्ये ८३५ किमी पर्यंतची रेंज देते. दुसऱ्या व्हेरिएंटमध्ये ९६.३ किलोवॅटची बॅटरी मिळते, जी ७६० किमीची रेंज देते. तिसऱ्या आणि सर्वात शक्तिशाली व्हेरिएंटमध्ये १०१.७ किलोवॅटची बॅटरी देण्यात आली, ज्यात ७७० किमीपर्यंत धावण्याची क्षमता आहे.
जाणून घ्या किंमत
शाओमी YU7 ची सुरुवातीची किंमत २ लाख ५३ हजार ५०० युआन म्हणजेच जवळपास ३० लाख रुपये ठेवण्यात आली आहे, जी टेस्ला मॉडेल व्हायपेक्षा सुमारे १.१९ लाख रुपये स्वस्त आहे. अशाप्रकारे, शाओमी YU7 केवळ तांत्रिकदृष्ट्या सक्षम नाही तर, पैशाच्या मूल्यासाठी आणि विशेषतः मिड-प्रीमियम इलेक्ट्रीक एसयूव्ही सेगमेंटच्या ग्राहकांसाठी एक उत्तम पर्याय आहे.